Site icon

नाशिक : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकला रंगला पालखी सीमोल्लंघन सोहळा

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही विजयादशमीला त्र्यंबक राजाच्या पालखीचा सीमोल्लंघन सोहळा रंगला. पालखीच्या सोहळ्याचे दृश्य मनोहारी होते. पालखीच्या पुढे देवस्थानाचे शस्त्रधारी कर्मचारी होते. त्र्यंबकेश्वर देवस्थान संस्थानात सकाळी शस्त्रपूजन करण्यात आले. दुपारी चारला पालखी सोहळा झाला. त्र्यंबकराजाच्या सुवर्ण मुखवट्याची देवस्थान ट्रस्ट कार्यालयातील मानकरी मनोहर दोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पारंपरिक अब्दागिरी पालखीवर धरण्यात आली. पालखी कुशावर्तावर व त्यानंतर मेनरोडने नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या शासकीय विश्रामगृहाजवळील शमी वृक्षाजवळ आणण्यात आली. तेथे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले व सोने लुटण्यात आले.

पूर्वी परंपरेने त्र्यंबकराजाची पालखी बाणगंगा नदी ओलांडून जायची. परंतु आता सुरक्षेच्या कारणास्तव साधारणत: तीस वर्षांपासून शहरापासून एक किलोमीटर अंतरावर पालखी नेऊन तेथे शमीवृक्षाचे पूजन करण्यात येते. काही वर्षांपासून येथील प्रभाकर धारणे व जयश्री धारणे यांनी माजी नगराध्यक्ष स्व. त्र्यंबकराव धारणे यांच्या स्मरणार्थ सीमोल्लंघनात पालखी उतरविण्यासाठी स्वमालकीची जागा देवस्थान संस्थानला दिली. 2014 पासून तेथे शमीवृक्षाचे पूजन करण्यात येते.

यंदा विश्वस्त तृप्ती धारणे, अ‍ॅड. पंकज भुतडा, संतोष कदम, दिलीप तुंगार यांनी पूजा केली. यावेळेस मंगेश दिघेक्क मोहन लोहगावकर, देवस्थान प्रशासकीय अधिकारी समीर वैद्यक्क रश्वी जोशी, अमोल माचवे आदींसह कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. मंदिर ट्रस्टच्या सेवेतील महिलांनी येथे त्र्यंबकराजाची पूजा केली. पालखी ग्रामदेवता महादेवी मंदिराच्या मार्गे त्र्यंबकेश्वर मंदिरात परतली.

दोरे कुटुंबाला शतकांपासून मान
त्र्यंबकेश्वर मंदिराचे शेकडो वर्षांपासूनचे मानकरी सोहळ्यास उपस्थित राहतात. हे विजयादशमी उत्सवाचे खास वैशिष्ट्य मानले जाते. हरसूल जवळच्या गडदवणे येथील देवी मंदिराचे पुजारी मनोहर दोरे हे आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहतात. त्यांच्याकडे असलेली अब्दागिरी यावेळेस त्र्यंबकराजाच्या पालखीवर धरली जाते. गडदवणे हे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.पूर्वी दोरे कुटुंबातील सदस्य येथे दर सोमवारच्या पालखीला येत असत. सध्या त्यांना देवस्थान संस्थानकडून धान्य दिले जाते.

हेही वाचा :

The post नाशिक : शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार त्र्यंबकला रंगला पालखी सीमोल्लंघन सोहळा appeared first on पुढारी.

Exit mobile version