Site icon

राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : श्रीकांत शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने नाफेडच्या माध्यमातून खरेदीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. राज्य सरकारही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कांदाप्रश्नी सरकारने चर्चा घडवून आणली आहे. लवकरच त्यावर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास शिवसेना युवा नेते खासदार ‌डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

शहरातील कालिदास कलामंदिर येथे पार पडलेल्या स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळाव्यानंतर खा. डॉ. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, युवा सेना जिल्हाध्यक्ष सदानंद नवले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. कांद्यासह इतर शेतीमालाच्या हमीभावासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विकासकामांना मोठी गती मिळाली. सरकारकडून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळाव्याचे आयोजन होत आहे. वर्षा बंगल्याच्या चहापाण्यावरून विरोधकांकडून अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे रात्री उशिरापर्यंत कामकाज करत असल्याची धडकी विरोधकांना भरत असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

संसद गटनेतेपदाबाबत पक्षस्तरावर निर्णय

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना कुणाची हा मुद्दा निकाली निघाली आहे. संजय राऊत यांच्याकडे संसदेतील गटनेते पद असून, याबाबत पक्षस्तरावर निर्णय होईल. पक्षाकडून लवकरच संसदेतील गटनेतेपदाबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल, असे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानला भेट

स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळाव्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला भेट दिली. कुसुमाग्रजांच्या मूळ गावी पहिल्यांदाच शिवसेनेच्या माध्यमातून कार्यक्रम झाला. मराठी भाषेला अभिजात राज्य भाषेचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. राज्यातील विविध शहरांच्या नामकरणांचा प्रश्न सुटला. त्याच धर्तीवर मराठीच्या अभिजात राज्य भाषेचा प्रश्न मार्गी लागेल, असा खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.

Exit mobile version