Site icon

शिवजयंती 2023 : नाशिकच्या हिरावाडीत स्वराज्याच्या आरमाराची उभारणी

नाशिक  (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त हिरावाडीतील कमलनगर चौकात स्वराज्याच्या आरमाराची भव्य प्रतिकृती साकारली जात आहे. याठिकाणी साकारलेल्या होडीत अंतर्गत शस्त्रागारही शिवप्रेमींना पाहायला मिळणार असून, शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिवजयंतीनंतर पाच ते सहा दिवस येथील आरमार देखावा बघायला मिळणार असल्याचे स्वागताध्यक्ष दिगंबर मोगरे यांनी सांगितले.

पंचवटीतील हिरावाडी येथे गेल्या दोन वर्षांपासून पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रेरणेने, माजी नगरसेवक अजय बोरस्ते व पूनम मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव यात्रेचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या देखाव्याचे विशेष महत्त्व म्हणजे, राज्य सरकार भिवंडी येथे या आरमारचे संग्रहालय साकारणार आहे. हे संग्रहालय उभारण्याआधी या आरमाराचा देखावा नाशिककरांना पाहायला मिळणार आहे. हा देखावा राजा (भय्या) पिरजादे यांच्या संकल्पनेतून साकारला जात असल्याचे मोगरे यांनी सांगितले. देखाव्यात प्रथम तुळजाभवानी मातेचे मंदिर, त्यानंतर जहाजावर जाता येणार आहे. जहाजाच्या तळमजल्यावर उतरून अंतर्गत शस्त्रागार अर्थात शिवकालीन शस्त्रप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. हा देखावा उभारणीचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. भिवंडी येथील ५० कारागीर यासाठी मेहनत घेत आहेत.

शनिवारी (दि. १८) महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी भगवान शंकर यांच्या लग्न वरातीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात नंदी व त्याचे भूत-पिशाच्च गण यांचा जिवंतपणा यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. यासह भगवान शंकराची बर्फाची शिवपिंड साकारली जाणार आहे.

शिवजन्मोत्सवानिमित्त यात्रा

आरमार देखावा यासह याठिकाणी १४ फूट उंच अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहे. येथील स्व. दत्ताजी मोगरे क्रीडा संकुलात यात्रेचे आयोजन केले असून, शिवजयंतीच्या दिवशी सायंकाळी महाआरती होईल. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व तुळजाभवानी मातेचा जिवंत देखावा पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

The post शिवजयंती 2023 : नाशिकच्या हिरावाडीत स्वराज्याच्या आरमाराची उभारणी appeared first on पुढारी.

Exit mobile version