Site icon

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचे प्रमुख दैवत असलेल्या श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी येत्या 18 जानेवारीच्या पौषवारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक दिंड्या नाशिकच्या वेशीवर पोहोचल्या असून, त्र्यंबकनगरीकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे त्र्यंबककडे जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले आहेत.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या यात्रा बंद पडल्या होत्या. परंतु यंदा मात्र सर्व धार्मिक क्षेत्रातील यात्रा सुरू झाल्याने घराघरांतून भक्त त्र्यंबकवारीसाठी बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून हजारो दिंड्या त्र्यंबकनगरीत सोमवारीच दाखल झाल्या आहेत. त्र्यंबकेश्वरची पौष वारी म्हणजे वारकरी सांप्रदायातील भाविक- भक्तांची महापर्वणीच मानली जाते. यासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर येथे येऊन श्री संत निवृत्तिनाथ महाराजांच्या चरणी लीन होतात. यंदाच्या हजारो दिंड्यांत स्थानिक गायक, वादक, टाळकरी सहभागी झाले आहेत. विश्वाचा तो गुरू, स्वामी निवृत्ती दातारू यासाठी श्री पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबा, तुकोबांच्या नामाचा जयघोष करीत दिंड्या त्र्यंबकनगरीकडे येत आहेत.

यंदाच्या दिंड्यांमधील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज असे पालखी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक दिंडीमध्ये 50 ते 1500 पर्यंत भक्त सामील झालेले आहेत. त्यासाठी भोजन व मुक्काम व्यवस्था, भजन, कीर्तन, भारूड, गौळणीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले गेले आहे.

सध्या बोराळे, बहादुरीहून निष्काम कर्मयोगी जीवनेश्वर संत काळूबाबा, खेडगाव, शिंदवड, विखारा पहाड, विजयनगर, अवनखेड तसेच दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अनेक दिंड्या या स्वामी नवनाथ महाराज शेलार, रमाकांत महाराज डोखळे, अशोक महाराज वैद्य, बंडा महाराज लखमापूरकर, युवराज महाराज दळवी, रामकृष्ण महाराज पिंपरखेड, कृष्णा महाराज जोपळे, मनू महाराज, माणिक महाराज शिवारपाडा आदी दिंड्या नाशिक शहरात दाखल झाल्या आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत त्या त्र्यंबकला मुक्कामी पोहोचतील.

यंदा प्रत्येक दिंडीमध्ये भव्यदिव्य रथ, चोपदार, तुळसधारी महिला, वासुदेव यामुळे दिंड्यांविषयी जनतेच्या मनातील आकर्षण निर्माण झाले आहे. यंंदा त्र्यंबकनगर विविध दिंड्या, असंख्य भाविक भक्तांनी उजळून निघणार आहे. आम्ही समस्त वारकरी या पौष महावारी पर्वणीसाठी सज्ज झालो आहे.
– नवनाथ महाराज शेलार, जीवनेश्वर काळूबाबा, दिंडीचालक, बोराळे

हेही वाचा :

The post संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल appeared first on पुढारी.

Exit mobile version