Site icon

आदित्य ठाकरे यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत: गुलाबरावांचा हल्लाबोल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र, यावरून आता बंडखोर आमदारांवर सर्वत्र टीका होऊ लागली आहे. आपल्यावर होत असलेल्या टीकेला पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटचे वारसदार असून, त्यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

यावल तालुक्यातील न्हावी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर भाषणातून निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. ना. पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटचे वारसदार असून, विचारांचे वारसदार नाहीत. तसेच आपण अलिबाबा चालिस चोरप्रमाणे शिंदे बाबा के चालिस आमदार आहोत. हा 32 वर्षांचा मुलगा येतो आणि आमच्यावर टीका करतो, त्याला आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या 35 वर्षांत आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते 32 वर्षाचं पोरगं आमच्यावर टीका करतं. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत असा एकेरी उल्लेखही पाटलांनी केला.

आमचं भाजपशी लव्हमॅरेज
शिवसेना कुणाची हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आहे. शिवसेना आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्हमॅरेज होतं म्हणून आम्ही आय लव यू म्हटले, बाकी काय केले? त्यामुळे शिवसेना आमचीच आहे, आम्ही बाळासाहेबांना, दिघेंना सोडलेले नाही, पक्षही सोडला नाही, असे ना. पाटील म्हणाले.

हेही वाचा ;

The post आदित्य ठाकरे यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत: गुलाबरावांचा हल्लाबोल appeared first on पुढारी.

Exit mobile version