Site icon

आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राष्ट्रपतींच्या दरबारात; विकास परिषदेने घेतली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशातील विविध राज्यांमध्ये विखुरलेल्या आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्याचे साकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोमजीभाई डामोर, उपाध्यक्ष तथा केंद्रीय पोलाद व ग्रामविकास राज्यमंत्री फगनसिंह कुलसते, शंकरराव बोडात, कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना घातले.

आदिवासी समाजातील पहिल्या महिला देशाच्या सर्वोच्चस्थानी राष्ट्रपतींच्या रूपाने विराजमान झाल्याने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. चर्चेदरम्यान आदिवासींची स्वतंत्र जनगणना करून आदिवासी धर्मकोड लागू करावा, प्रत्येक राज्यात आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, भारतीय सैन्य दलामध्ये आदिवासी बटालियन तुकडी स्थापन करावी आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रातील सर्व विभागातील पेसा पदभरती करण्यात यावी. कसारा घाटाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे, तर इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील भावली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर याचे नाव द्यावे आदी मागण्यांचे निवेदन परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष जितेंद्र मोघे, रामसाहेब चव्हाण, गणेश गवळी, सोमनाथ खोटरे आदी उपस्थित होते.

पाचव्या अनुसूचीची अंमलबजावणी

महाराष्ट्रात पाचव्या अनुसूचीची अंमलबजावणी करावी, जयपालसिंह मुंडा यांचा इतिहास सर्व विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात घ्यावा, अनुसूचित क्षेत्रातील बेकायदेशीर जमिनींचे हस्तांतर थांबवावे, महाराष्ट्रातील आदिवासींची 2017 ची रखडलेली विशेष पदभरतीची अंमलबजावणी करावी, गायरान व वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या, आदिवासी कलाकारांना मासिक मानधन मिळावे, आदिवासींचे धर्मांतरण रोखण्यासाठी सक्षम कायदे बनवावे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

हेही वाचा :

The post आदिवासींच्या समस्या थेट मांडल्या राष्ट्रपतींच्या दरबारात; विकास परिषदेने घेतली भेट appeared first on पुढारी.

Exit mobile version