Site icon

आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर रोजगार देतो; सामंतांचा राऊतांना टोला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीचे सरकार कोसळून आठ महिने झाले. राज्यात सत्तापालटानंतर काही जणांना बेरोजगारीचा ‘सामना’ करावा लागत आहे. जे बेरोजगार झालेत, त्यांना सत्ताधारी नेत्यांवर तेच तेच आरोप करावे लागत आहेत. त्यामुळे अशांना खऱ्या अर्थाने कौशल्य विकास प्रशिक्षणाची गरज आहे. आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर खऱ्या अर्थाने रोजगार देतो, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.

औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथे रविवारी (दि. ४) आयोजित खासदार बेरोजगार मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, महंत सुधीर पुजारी, भक्ती गोडसे, प्रवीण तिदमे, किरण रहाणे, प्रकाश वारी, विदेश मोरे, लक्ष्मी ताठे, माजी आमदार पांडुरंग गांगड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. वेदांतासारखे उद्योग राज्यातून परराज्यात जाण्यासाठी मविआचे सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. वेदांता प्रकल्प राज्यात उभा राहण्यासाठी जवळपास आठ महिने समिती स्थापन झाली नव्हती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री नेमका कोणता मुहूर्त बघत होते, हा प्रश्न सामंत यांनी उपस्थित केला. मविआ सरकारमध्ये मुख्यमंत्री रोजगार योजनेला १७० कोटी रुपये मिळाले होते. त्याउलट आता ५५० कोटी रुपये मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी मिळाले असून, गरज भासल्यास पाचशे कोटी आणखी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे यावेळी ना. सामंत यांनी सांगितले.

रयतेच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांनी धरला होता. विकासकामे करताना कुटुंब विकास होणे गरजेचे आहे. म्हणून राज्यातील सध्याचे सरकार घर पेटविण्यापेक्षा चूल पेटविण्याचे काम करीत असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

मामाच्या गावाला भेट द्याल : ना. भुसे

मामा पाठीमागे उभा असल्याशिवाय विवाहसोहळा पार पडत नाही. त्यामुळे नाशिक तुमच्या मामाचे गाव असल्याने तुम्ही काही तरी भेट नक्की द्याल, असा विश्वास आम्हाला असल्याचे नामदार दादा भुसेंनी मंत्री सामंतांना उद्देशून सांगितले.

रस्त्यावर बसून भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीकडे पिंजऱ्यात पोपट असतो. तो पोपट पिंजऱ्यातून बाहेर येऊन पत्ते काढण्याचे काम करतो. अगदी तसेच ठाकरेंचा एक पोपट काल नाशिकमध्ये येऊन गेल्याचे सांगून, संजय राऊत यांच्यावर खा. हेमंत गोडसे यांनी हल्लाबोल केला.

नाशिकला नवीन एमआयडीसी

नाशिकमधील औद्योगिक वसाहत व उद्योग क्षेत्रात मोठ्या अडचणी आहेत. नवीन उद्योग येत नसल्याचे सांगून पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले. यानंतर सामंत यांनी भुसे यांचा हाच धागा पकडून, नाशिकला नव्याने एमआयडीसी देण्याचे आश्वासन दिले. इतकेच नाही तर नवनवीन उद्योग नाशिकला येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी ना. सामंत यांनी सांगितले.

१५०० जणांना रोजगार

या बेरोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील शंभरपेक्षा अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपस्थित होते. जवळपास ३ हजार बेरोजगार युवक-युवतींनी नोंदणी केली होती. यातील सुमारे १ हजार पाचशे उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यातील काही जणांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्रेही देण्यात आली.

हेही वाचा :

The post आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर रोजगार देतो; सामंतांचा राऊतांना टोला appeared first on पुढारी.

Exit mobile version