Site icon

उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले होते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या याच मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, ‘मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावे पुढे केली होती’ असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे.

शिवजयंतीनिमित्त विविध मंडळांना गाठीभेटी देत असताना माध्यमांशी बोलताना भुजबळांनी याबाबतचे विधान केले. भुजबळ म्हणाले की, ‘माझ्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशी काही नावे पुढे केली होती. अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचविण्यात आले होते. परंतु, सिनिअर म्हणून ठाकरे यांना गळ घालण्यात आली. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी तसा आग्रह केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आले होते’, असे भुजबळ म्हणाले. तसेच ‘खरी शिवसेना कुठली आहे, हे जनता ठरवेल. त्यासाठी निवडणुका आवश्यक आहेत. समाजमाध्यमांमुळे निशाणी आणि नावे सर्वदूर जातात. शेवटी संघटनेचा प्रमुख कोण आहे, हेच लोक लक्षात घेतात. त्यामुळे आता जनताच ठरवेल कुणाला ठेवायचे आणि कुणाला नेस्तनाबुत करायचे, असेही भुजबळ म्हणाले.

दिल्लीतूनच स्क्रिप्ट तयार

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपने शिंदे गटाला नाव व चिन्ह मिळवून देण्यासाठी दाेन हजार कोटींचा सौदा केल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, यावर मला काही जास्त सांगता येणार नाही. पण शिवसेनेतून फुटून ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि बाकी लोक फुटले. या घटनेची स्क्रिप्ट दिल्लीतून तयार झाली आहे. त्यांच्याकडे अशाप्रकारचे व्यवस्थापन कौशल्य असल्याने या गोष्टी घडून आल्या आहेत. यावर महाराष्ट्रातील जनता काय म्हणते हे बघावे लागेल, असे भुजबळांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले होते appeared first on पुढारी.

Exit mobile version