Site icon

घराचे छत कोसळून धुळ्यात पिता-पुत्राचा मृत्यू

धुळे, पुढारी वृत्तसेवा : मातीच्या घराचे छत कोसळून पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना धुळे तालुक्यातील वडणे बुरझड गावात घडली. या घटनेत महिलेसह दोघी मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घरातील दोघे कर्तेपुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

वडणे बुरझड येथे प्रवीण पाटील, त्यांचा मुलगा गणेश पाटील, पत्नी प्रेरणा पाटील तसेच मुली भूमी पाटील आणि हेमांगी पाटील रात्री घरात झोपी गेले. मध्यरात्रीनंतर अचानक घराचे छत कोसळल्याने मोठा आवाज आला. त्या पाठोपाठ ढिगार्‍याखाली अडकलेल्या मुली आणि महिलांचा मदतीसाठी मोठा आवाज आला. त्यामुळे नजीकचे नागरिक घराबाहेर आले. त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, मातीच्या ढिगार्‍याखाली पाटील परिवार दबला गेला होता. काही वेळानंतर नागरिकांनी मुलगी हेमांगी पाटील आणि भूमी पाटील तसेच प्रेरणा पाटील यांना ढिगार्‍याच्या बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले.

कुटुंबप्रमुख असलेले प्रवीण पाटील आणि गणेश पाटील यांना ढिगार्‍याबाहेर काढल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे निदर्शनास आले. त्यांना देखील तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात देखील त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, ही घटना पाऊस नसूनदेखील अचानक घडली. तसेच एकाच परिवारातील एकुलता एक मुलगा आणि पिता यांचा मृत्यू झाला. आई देखील गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. शोकाकुल वातावरणात एकाच वेळी पिता-पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

The post घराचे छत कोसळून धुळ्यात पिता-पुत्राचा मृत्यू appeared first on पुढारी.

Exit mobile version