Site icon

घरात बसून लोकांच्या भावना कशा कळणार? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी तळागाळात जावे लागते. घरात बसून चार भिंतीच्या आत त्या भावना कशा कळणार, असा प्रश्न करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार तथा युवानेते श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांचे सोमवारी (दि.२६) नाशिकमध्ये आगमन झाले असता पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, तुम्हीच अडीच वर्षे घरी बसून कामे केली. त्यामुळेच राज्य मागे गेले. ५० आमदार आणि १३ खासदारांनी तुम्हाला सोडले. लोक का चालले याचे आत्मपरीक्षण ठाकरेंनी करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आपले काय चुकतेय हे उद्धव ठाकरेंनी एकदा तपासून घ्यायला हवे. त्यांनी अडीच वर्षे घरी बसून काम केल्यानेच राज्य अडीच वर्षे मागे गेले. विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलणारे अडीच वर्षांत पहिल्यांदाच नागपूरला आले असतील, असा टोला लगावत शिंदे-फडणवीस हे डबल इंजिन सरकार आहे आणि ते उत्तमपणे राज्याचा कारभार हाकत असल्याचा दावा त्यांनी केला. राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत लागेल तेव्हा तेव्हा केंद्राकडून मदत घेण्याचे काम राज्य सरकार मोठ्या मनाने करेल, असेही खासदार शिंदे यांनी सांगितले.

राऊत लोकांची सकाळ खराब करतात

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची अजिबात आवश्यकता नाही. राज्यातील विरोधकांकडे प्रश्नच उरलेले नाहीत. त्यामुळेच ते नको त्या गोष्टी उखडून मांडत आहेत. अभ्यास न करताच बेछूट होणारे आरोप सर्वांनाच ठाऊक आहेत त्यात नवीन काहीच नाही. विरोधकांकडे केवळ टोमणे आणि आरोप करण्याचेच काम उरले आहे. संजय राऊत रोज सकाळी आरोप करून लोकांची चांगली सकाळ खराब करत असल्याची टीकाही खासदार शिंदे यांनी केली.

हेही वाचा :

The post घरात बसून लोकांच्या भावना कशा कळणार? श्रीकांत शिंदेचा ठाकरेंना टोला appeared first on पुढारी.

Exit mobile version