Site icon

त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूस असलेल्या गौतम तलावात भाविकांनी टाकलेल्या साबुदाणा खिचडीने तलावातील हजारो मासे मरण पावले आहेत. मृत माशांमुळे तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

सोमवारी (दि. 28) मंदिराच्या दक्षिण दरवाजाला भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले होते. दर्शन आटोपल्यानंतर भाविक दक्षिण बाजूस असलेल्या गायत्री मंदिराच्या दरवाजाने बाहेर पडतात. अनेक भाविकांनी खिचडीने भरलेले द्रोण घेउन ते माशांना खायला दिले. पाण्यात साबुदाण्यामुळे पाण्यावर चिकट तवंग तयार झाला आहे. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावली आणि मासे मरण पावले. मंगळवार (दि. 29) पासून दररोज मासे मरून पाण्यावर तरंगत आहेत.

गौतम तलावात गेल्या 15 वर्षांपासून मासे जोपासण्यात आले आहेत. मंदिर प्रांगणात असलेल्या अमृत कुंडाची स्वच्छता करताना तेथील मासे गौतम तलावात सोडण्यात आले. सध्या भरपूर पाऊस झाल्याने तलावात पाणी असून माशांची संख्याही वाढली आहे.

नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तलावातील मृत मासे काढून घेत तलावातील पाणी वाहते ठेवण्यासाठी असलेल्या झडपा खुल्या केल्या आहेत. मात्र दुर्गंधी कायम आहे. यापूर्वी दोनदा तलावातील मासे मृत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकारी श्रीया देवचके यांनी पाहणी केली. देवस्थान ट्रस्ट प्रशासनाला पत्र दिले असून, त्यामध्ये तलावाच्या परिसरात साबुदाणा खिचडी वाटप करण्यात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. भाविक आणि स्थानिक नागरिकांनी तलावात अन्नपदार्थ टाकू नये, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वरला फराळाच्या खिचडीने गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Exit mobile version