Site icon

धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील धोकादायक वाड्यांसह मिळकतीतील रहिवासी जागा खाली करण्यास तयार नसल्याने मनपा आयुक्त रमेश पवार यांनी संबंधित एक हजार 77 वाडा व मिळकतधारकांना अंतिम नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे वाडे, मिळकतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश असून, त्यास कोणी विरोध केल्यास संबंधित जागेचे क्षेत्रफळ मोजून त्यानंतर तेथील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी महापालिकेकडून धोकेदायक वाड्यांना तसेच इमारतींना नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, तेथील रहिवाशांना स्थलांतरित करण्याचे किंवा धोकादायक बांधकाम पाडण्यावर ठोस निर्णय होत नसतात. त्यातच तिवंधा चौक परिसरातील धोकादायक वाड्यांचा भाग कोसळल्यानंतर मनपा आयुक्त पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून रहिवाशांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत.

आयुक्त पवार यांनी मे महिन्यातच धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करून जे वाडे धोकादायक असतील, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, संबंधित वाडे, इमारत व अन्य मिळकतधारकांना प्रथम नोटीस देऊन सुरक्षितस्थळी हलवण्याबाबत सूचित केले होते. त्यानंतरही अनेक मिळकतीत रहिवासी राहत होते. त्यामुळे त्यांना दुसर्‍यांदा नोटीस बजावण्यात आली. तरीदेखील काही मिळकतधारक धोकादायक घरात राहत असल्याने पावसाचा जोर वाढल्यास दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याचा धोका असल्याने संबधितांना तिसरी नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

सर्वेक्षणानंतर कारवाई
पालिका हद्दीतील धोकादायक वाडे व इमारती यांचे सर्वेक्षण करून त्यानंतर धोकादायक वाडे रिकामे करून जमीनदोस्त करण्याबाबत यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. त्यानंतरही कारवाई झाली नसेल तर उच्च न्यायालयातील याचिका क्रमांक 1135 नुसार नोटिसा बजावणे, पोलिस विभागाची मदत घेणे, विद्युत व पाणीपुरवठा खंडित करणे, असे अंतिम नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

विभागनिहाय धोकादायक वाडे, घर
विभाग                        नोटिसा दिलेले
नाशिक पश्चिम             600
सातपूर                        68
नाशिक पूर्व                  117
नवीन नाशिक               25
पंचवटी                       198
नाशिकरोड                  69
एकूण                        1077

हेही वाचा :

The post धोकादायक वाड्यांचा पाणी, वीजपुरवठा होणार खंडित appeared first on पुढारी.

Exit mobile version