Site icon

नाशिककरांनी लुटला अनोख्या मडबाथचा आनंद

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

चामरलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे सालाबादाप्रमाणे आयोजित मडबाथचा (माती स्नानाचा) आनंद आबालवृद्धांसह हजारो लोकांनी लुटला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून, हे सारे जणू काही आदिम काळातून आले काय, असा नजारा होता.

महेश शहा, चिराग शहा तसेच योगगुरुजी नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 26 वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यानुसार रविवारी (दि. 9) हा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडला होता. मात्र गेल्या वर्षापासून पुन्हा हा उत्सव सुरू झाला. या वर्षी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागांतील आणि नाशिकमधील सुमारे 1000 लोकांनी मडबाथचा आनंद लुटला. वारुळाची माती गोळा करत आठ दिवस आधी भिजवली जाते. संपूर्ण शरीराला ती लावून अंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे यामुळे शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते, असे नंदू देसाई यांनी सांगितले.

हा कार्यक्रम पहाटे सुरू झाला. बघता बघता लोकांचे थवेच्या थवे येथे येऊ लागले आणि स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले. यावेळी 25 फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता आणि त्यात चिखल होता. या टबमध्ये 25 ते 30 लोक एकाचवेळी उतरून व अंगाला चिखल लावून बाहेर येत होते. नंतर दोन तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून मडबाथचा आनंद लुटत होते.

मडबाथ घेणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी पोलिस आयुक्त हरीश बैजल तसेच प्रदीप पाटील, ॲड. धर्मेंद्र चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर चोपडे, सतीश मुंदडा, प्रवीण संचेती, अभय कटारिया आदींसह नाशिक सायकलिस्ट, जॉगर्स ग्रुप, जल्लोष ग्रुप, पंचवटी व्यापारी ग्रुप, नाशिक इको ड्राइव्ह, चामरलेणी इको ड्राइव्ह, मुंबई ग्रुप आदी ग्रुपचे सदस्य आदींचा समावेश होता. पंढरपूरहून आलेले सायकलिस्ट असोसिएशनच्या सदस्यही यात सहभागी झाले होते.

नाशकात मडबाथचे आयोजन केले जाते आणि त्यासाठी मला आमंत्रित केल्याचे समजल्यानंतर त्याचा आनंद लुटण्यासाठी मी आवर्जून आलो.

– हरीश बैजल, माजी पोलिस आयुक्त

हेही वाचा : 

The post नाशिककरांनी लुटला अनोख्या मडबाथचा आनंद appeared first on पुढारी.

Exit mobile version