Site icon

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बेडअभावी बाळंतिणी दिवसभर खुर्च्यांवर बसून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महिला प्रसूतीबाबत शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्या केवळ फार्स ठरत असल्याचे दुर्दैवी चित्र जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी (दि. 4) दिसून आले. येथील प्रसूती (कांगारू माता) वॉर्डात एक दिवसाच्या बाळंतिणीला बेड उपलब्ध नसल्याने दिवस-दिवसभर खुर्चीवर बसवून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. यातील अनेक मातांना बाळंतपणानंतरही बेड उपलब्ध होत नसल्याने तासन्तास खुर्च्यांवरती बसवून ठेवले जात आहे. गुरुवारी रात्री महापालिकेच्या स्वामी समर्थ रुग्णालयात प्रसूती झालेल्या सुजाता राहुल खरात या महिलेच्या नवजात बाळाला इमर्जन्सीमध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मनपाच्या रुग्णालयाकडून या महिलेला शुक्रवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या महिलेला दिवसभर बेड उपलब्ध नसल्याने तिला खुर्चीवर ठेवण्यात आले होते. याबाबत तिने तेथील कर्मचार्‍यांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. वॉर्डात अशाच प्रकारे 8 ते 10 महिला दिवसभर खुर्चीवर बसून असल्याने या महिलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले. हीच परिस्थिती या वॉर्डात नियमित असून, ग्रामीण भागातील महिलांनी तक्रार करूनही त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याची कैफियत या महिलांनी मांडली आहे. दरम्यान, एका बाजूला महिलांची प्रसूती सुखकर होण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपाययोजना राबविल्या जात असताना अपुर्‍या बेडमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याने शासनाच्या योजना फार्स ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक बैठकांत व्यस्त
याबाबत ‘पुढारी’ प्रतिनिधीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना भेटून तसेच दूरध्वनी करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून बैठकांमध्ये असल्याचे कारण देण्यात आले. उशिरापर्यंत त्यांच्याशी संवाद होऊ न शकल्याने या महिलांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुरुवारी रात्री मनपाच्या रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी 1पासून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून बेड उपलब्ध नसल्याने खुर्चीवर बसवून ठेवले आहे. याबाबत प्रशासकीय कार्यालयात तसेच कर्मचार्‍यांकडे तोंडी तक्रार केली. मात्र, उपयोग झाला नाही. रात्री 7 पर्यंत माझ्यासह किमान आठ महिला खुर्चीवर बसून होत्या.
– सुजाता राहुल खरात,
प्रसूत महिला

हेही वाचा :

The post नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बेडअभावी बाळंतिणी दिवसभर खुर्च्यांवर बसून appeared first on पुढारी.

Exit mobile version