Site icon

नाशिकमधील बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुर्दशा, ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

गंगापूररोडवरील हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संग्रहालय उद्यानाची दुर्दशा झाली असून, त्याकडे महापालिकेने त्वरित लक्ष न दिल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे या उद्यानाला पूर्ववत झळाळी आणण्याचे काम हाती घेतले जाईल, या आशयाचे निवेदन या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले.

नाशिक : मनपा आयुक्तांना निवेदन देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

नाशिक महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपये खर्चून गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशननजीक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शस्त्र संग्रहालय व उद्यान उभारले आहे. लोकांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कायम चिरंतन रहावी आणि त्यांचे विचार लोकांमध्ये रुजावे हा हे उद्यान बांधण्यामागचा खरा उद्देश होता. मात्र सुरुवातीला लोकांचे आकर्षण केंद्र बनलेले आणि एक पर्यटनकेंद्र म्हणून विकसित झालेल्या या स्मारकाची कमालीची दुरवस्था झाली आहे. स्मारकाला काटेरी झाडाझुडपांनी वेढले आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. स्मारकात असलेल्या कार्यालयाचा वापर भंगाराचे साहित्य ठेवण्यासाठी, कपडे वाळविण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी केला जातो, हे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रवेशद्वार केवळ नावापुरते आहे. कालादलनाचे दरवाजे तुटले आहेत. छत केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही, असे ठाकरे गटाने निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले.

संग्रहालयाला कुलूप लावण्यात आले आहे. तेथे जाणाऱ्या रस्त्यावरील खडी उखडली आहे. परिसरात दुर्गंधी तर पाचवीलाच पुजलेली आहे. संग्रहालयात लावण्यात आलेल्या फलकांचीही पडझड व मोडतोड झाली आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन या स्मारकाची तातडीने दुरुस्ती करावी व त्यास पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे आणि स्मारकाच्या दुरवस्थेस जबाबदार असलेल्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, उपमहानगरप्रमुख नाना पाटील, सचिन बांडे, उपमहानगर संघटक रवींद्र जाधव, विरेंद्र टिळे, विभागप्रमुख विनोद नूनसे, प्रमोद नाथेकर, दस्तगीर पानसरे, जिल्हा कार्यालयप्रमुख राजेद्र वाकसर यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमधील बाळासाहेब ठाकरे संग्रहालयाची दुर्दशा, ठाकरे गटाची आयुक्तांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Exit mobile version