Site icon

नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाअंतर्गत नाशिकमध्ये शनिवारी (दि.१४) शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने डझनभर मंत्री एकाच व्यासपिठावर एकत्रित येणार आहेत.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर सकाळी ११ ला शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोेजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमास्थळी तयारीचा अंतिम आढावा घेण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जिल्ह्याभरातून येणाऱ्या ३५ हजार लाभार्थींची आसनव्यवस्था तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री यांच्याहस्ते जिल्ह्यातील लाभार्थींना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात याेजनांच्या लाभाचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी विविध शासकीय योजनांचे माहिती देणारे स्टाॅल्स‌् ऊभारण्यात आले आहेत. शासन आपल्या दारीच्या निमित्ताने नाशिकम‌ध्ये तीन्ही पक्षांचे मंत्री एकाच व्यासपीठावर एकत्रित येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे तीन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

राेजगार मेळाव्याचे आयोजन

शासन आपल्या दारी योजनेअतंर्गत कार्यक्रमस्थळी राेजगार व कौशल्य विकास विभागामार्फत राेजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध ४५ कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच पाच हजार युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न विभागाचा असणार आहे.

आरोग्य शिबीर

आरोग्य विभागामार्फत कार्यक्रमस्थळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहर व ग्रामीण भागातून आलेल्या लाभार्थींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

असे असेल सगळे…

-जिल्ह्यातून ३५ हजार लाभार्थींची उपस्थिती

-ग्रामीण भागातून बसेसने येणार लाभार्थी

-सरकारी योजनांचे माहिती देणारे ४० स्टॉल्स‌्

-शहरात बसेससाठी स्वतंत्र्य वाहनतळ व्यवस्था

-सिटीलिंकद्वारे शहरातील लाभार्थींचे ने-आण

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती appeared first on पुढारी.

Exit mobile version