Site icon

नाशिकमध्ये काँग्रेसचे “जवाब दो’ आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल तथा भाजप नेते सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्याच्या वेळी सीआरपीएफ जवानांच्या तुकड्यांना रस्त्यावरून प्रवास करण्यास सांगण्याऐवजी विमानाने प्रवास करावा, अशी मागणी केली होती. मात्र, सरकारने रस्त्यानेच पाठविल्याने अनेक जवानांना नाहक जीव गमवावा लागल्याचे सांगितले. या प्रकरणी केंद्राने सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, यासाठी मंगळवारी (दि.१८) काँग्रेसतर्फे ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी ग्रुपचे गैरव्यवहार तसेच मोदी आणि अदानी यांच्या संबंधावरून संसदेत प्रश्न उपस्थित केले होते. मोदी- अदानी यांच्याकडून राष्ट्रीय संपत्तीच्या लुटीचे पितळ उघडे पाडले. या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. अदानी समूहाच्या घाटाेळ्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींनी उत्तर दयावे, अशी मागणी करत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली.

काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष अ‍ॅड. आकाश छाजेड यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांसह राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात जोरदार आसूड ओढले. विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, माजी नगरसेविका वत्सला खैरे, सुचेता बच्छाव, एनयूआयएसचे जिल्हाध्यक्ष अल्तमेश शेख, कुसुम चव्हाण, राजेंद्र बागूल, रमेश कहांडोळे, स्वाती जाधव, गौरव सोनार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये काँग्रेसचे "जवाब दो' आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version