Site icon

नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या मुंबई आणि इतर शहरांत लहान मुलांना गोवर या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातही रुग्ण आढळून येत असल्याने त्याबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाला उशिराने का होईना जाग आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात गोवरचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. इतर शहरांतही रुग्ण आहेत. नाशिकच्या शेजारीच असलेल्या मालेगाव शहरातही रुग्ण आढळून आल्याने भीती निर्माण झाली आहे. यानंतर मात्र नाशिक महापालिकेला जाग येऊन या आजारापासून घ्यावयाच्या काळजीबाबत आवाहन केले आहे. विषाणूपासून होणारा हा संसर्ग खोकण्यातून किंवा शिंकण्यातून होतो. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असून, मुलांमध्ये काही लक्षणे आढळल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन मनपाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी केले आहे.

गोवरची लक्षणे :

गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी आणि चार ते सहा दिवसांनंतर दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अंधत्व येऊ शकते. रुग्णाच्या श्वसनलिकेला सूज येऊन रुग्णांना श्वसन प्रकियेत त्रास होण्याची शक्यता असते. गोवर झालेल्या रुग्णांमध्ये तीव— ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात.

निदान झाल्यास मुलांना शाळेत पाठवू नये
या आजाराचे निदान झाल्यास त्या मुलांना शाळेत पाठवू नये. कारण हा आजार वेगाने प्रसार करणारा आहे. वेगळ्या खोलीत ठेवावे. भरपूर विश्रांती घ्यायला लावणे. बहुतांशवेळा मुले लहान असल्याने एकट्याला खोलीत ठेवणे शक्य नसते. प्रौढांना या आजाराचा फारसा धोका नसतो. आजारी मुलांना मात्र इतर मुलांबरोबर मिसळू देऊ नये. आपल्या घराजवळच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लक्षणांबाबत माहिती देऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन डॉ. साळुंखे यांनी केले

डोस कधी घ्यावा
ज्या बालकांनी या लशीचे दोन डोस ठरवून दिलेल्या वेळेत घेतले आहेत. त्यांना आजार होण्याची शक्यता कमी असते. मात्र, होणारच नाही याची हमी देता येत नाही. तीन टक्के बालकांना लस घेतल्यानंतरही हा आजार होऊ शकतो. ज्या मुलांनी लस घेतलीच नाही किंवा एकच डोस घेतला अशा बालकांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे बालकाचे वय 9 महिने पूर्ण झाल्यानंतर पाहिला डोस घेण्यास हरकत नाही. दुसरा डोस 16 ते 24 महिने झाल्यावर घेण्यात यावा.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गोवरबाबत आरोग्य विभागाला उशिराने जाग appeared first on पुढारी.

Exit mobile version