Site icon

नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसामुळे साचलेल्या डबक्यांत डासांची वाढती पैदास नाशिक शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढविणारी ठरली आहे. गेल्या पंधरवड्यात शहरात डेंग्यूच्या नव्या ४७ रुग्णांची नोंद झाल्याने डेंग्यू बाधितांचा आकडा १९२ वर गेला आहे. डोळ्यांच्या साथीमुळे सैरभर झालेल्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची चिंता डेंग्यू रुग्णसंख्येच्या वाढत्या आकड्यामुळे अधिकच वाढली आहे.

मुंबई-पुणे आणि ठाण्यापाठोपाठ नाशकातही डोळ्यांच्या साथीची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. दररोज डोळ्यांच्या साथीचे चारशेवर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त असताना डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरला आहे. पावसाळा सुरू होताच, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. यंदाही पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत गेली. जूनपर्यंत शहरात ११६ डेंग्यूचे रुग्ण होते. त्यात जुलै महिन्यात ३२ रुग्णांची भर पडली. ऑगस्टमध्ये तर या आजाराचा प्रादुर्भाव अधिकच वाढला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल २५ रुग्णांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले होते. पाठोपाठ दुसऱ्या आठवड्यातही २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पंधरवड्यात तब्बल ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील डेंग्यूग्रस्तांचा आकडा १९२ वर पोहोचला आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना, गेल्या वर्षाच्या तुलनेत रुग्णवाढ कमी असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. तर डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून नष्ट करण्यासाठी शहरात ६० आरोग्य पथके तैनात केली आहेत. या पथकांमार्फत शहरात तपासणी सुरू असल्याचा दावाही पालिकेकडून केला जात आहे.

कोरडा दिवस पाळा

डेंग्यूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव ‘एडीस इजिप्ती’ या जातीच्या डासांमार्फत होतो. एडीस डासांची उत्पत्ती सात दिवसांपेक्षा जास्त काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. पाण्याच्या टाक्या, बॅरल, हौद, रांजण, ओहरहेड टँक, फ्रीज मागील ट्रे, कुलर, फिशटँक, एसी, डक, लिफ्ट, टायर, फुलदाणी, चायनीज बांबू, मनी प्लांट यामध्‍ये साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे घर परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. घरातील भांडी, टाक्यांमधील साचलेले पाणी रिते करून भांडी स्वच्छ धुवून काढावीत. शक्यता आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डेंग्यूची महिनानिहाय रुग्णसंख्या

जानेवारी- १७

फेब्रुवारी- २८

मार्च- २८

एप्रिल- ८

मे- ९

जून- १३

जुलै – ३२

ऑगस्ट – ४७

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये डेंग्यूची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात appeared first on पुढारी.

Exit mobile version