Site icon

नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी असलेल्या तांब्या-पितळेच्या वस्तू चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे बहुतांश मंडळांच्या ठिकाणी पोलिस तसेच कार्यकर्त्यांचा पहारा असतानाही काही भामटे अत्यंत हाथसफाईने या वस्तू लंपास करीत आहेत. या भामट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद असून, मोठमोठ्या गणेश मंडळांच्या मूर्ती बघण्यासाठी नाशिककरांची एकच गर्दी होत आहे. शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने, गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र, काही भामटे गर्दीचा फायदा घेऊन तांब्या-पितळेच्या वस्तूंवर हात साफ करीत आहेत. गणरायाच्या आरतीसाठी तसेच पूजेसाठी मंडळाच्या ठिकाणी तांब्या-पितळाचे गडवे, फुलपात्र, पळी, ताह्मण, अभिषेक पात्र आदी वस्तू हमखास बघावयास मिळतात. या वस्तू लंपास करण्यासाठी चोरटे सक्रिय झाले आहेत. सोन्या-चांदीच्या वस्तूंनंतर तांब्या-पितळेच्या वस्तूंना बाजारात चांगला भाव मिळतो. त्यामुळे चोरटे या वस्तू पळविण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

सध्या या चोरट्यांनी बहुतांश गणेश मंडळांतील तांब्या-पितळेच्या वस्तू चोरल्या असून, त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

सातपूरला संशयित सीसीटीव्हीत कैद
सातपूर परिसरात याबाबतची एक घटना उघडकीस आली असून, चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या चोरट्याचा पेहराव लक्षात घेता, तो उच्चशिक्षित असावा, असेच दिसून येते. हे चोरटे अगोदर गणपती ज्या ठिकाणी विराजमान आहेत, त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती घेतात. पोलिस तसेच कार्यकर्ते किती काळ मंडळाच्या ठिकाणी असतात, याची अगोदर चाचपणी करतात. कार्यकर्ते जेवायला किंवा काही कामानिमित्त दोन-पाच मिनिटे जरी बाहेर गेले, तरी तांब्या-पितळेच्या वस्तू चोरटे गायब करतात.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये तांब्या-पितळेच्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा, संशयित सीसीटीव्हीत कैद appeared first on पुढारी.

Exit mobile version