Site icon

नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस, सिटीलिंककडून खरेदीला मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारच्या एन कॅपच्या योजनेतून २५ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने अर्थात, सिटीलिंकने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या तत्त्वावर बसेस ठेकेदाराकडून संचलित केल्या जातील. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक बसेसकरिता मिळणारे प्रतिबस अनुदान थेट ठेकेदाराला वळते केले जाणार आहे. सिटीलिंककडून बसेससाठी मार्चमध्ये निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.

महापालिकेने इलेक्ट्रिक बससेवेसाठी केंद्र शासनाकडून प्रतिबस ५५ लाख रुपये अनुदान अपेक्षित धरले होते. परंतु, केंद्राकडून सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे महापालिकेने ‘एन कॅप’ अर्थात नॅशनल एअर क्लिन मिशन योजनेअंतर्गत बसेसची संख्या ५० वरून २५ पर्यंत घटवत तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. ‘एन कॅप’मधून पालिकेला दरवर्षी २० ते २२ कोटींचा निधी हवा शुद्धतेसाठी मिळत असतो. या निधीतून इलेक्ट्रिक बस खरेदी करायचा निर्णय मनपाने घेतला. शासनाकडून मिळणारे अनुदान थेट पात्र ठेकेदाराला देऊन इलेक्ट्रिक बसेस चालविण्यास प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे, वित्त व लेखाधिकारी नरेंद्र महाजन, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, चीफ ऑपरेशन व्यवस्थापक मिलिंद बंड उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस, सिटीलिंककडून खरेदीला मंजुरी appeared first on पुढारी.

Exit mobile version