Site icon

नाशिकमध्ये 1 कोटी 10 लाखांचे खाद्यतेल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून शहर व परिसरात धडाकेबाज कारवाई केली जात असल्याने, भेसळयुक्त तसेच कमी दर्जाच्या खाद्यतेलाची विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने नाशिक तालुक्यातील शिंदे येथील नायगाव रोडवरील मे. माधुरी रिफायनर्स प्रा. लि. या कारखान्यावर छापा टाकून तब्बल 1 कोटी 10 लाख 11 हजार 280 रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. उच्च प्रतीचे खाद्यतेल असल्याची जाहिरात करून ते ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार याठिकाणी सुरू असल्याचे समजते.

अन्नसुरक्षा सप्ताहांतर्गत अन्नसुरक्षा विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासोबतच खाद्यतेलाचे नमुने तपासण्याची मोहीमदेखील हाती घेण्यात आली आहे. दिल्ली येथील अन्नसुरक्षा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात नामांकित ब—ॅण्डसह अन्य खाद्यतेलांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने नायगाव रस्त्यावरील मे. माधुरी रिफायनर्स प्रा. लि. या कारखान्यातील खाद्यतेलाच्या डब्यांवर लेबल दोष आढळून आला.

लेबलवर केलेल्या दाव्यात फोर्टिफाइड खाद्यतेलाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात मात्र ‘पल्स एफ’चा सिम्बॉल नाही. त्यामुळे ते खाद्यतेल फोर्टिफाइड नसल्याची दाट शक्यता असल्याने अन्नसुरक्षा विभागाने कंपनीतील वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यतेलांचे सात नमुने ताब्यात घेऊन कंपनीतील साठा जप्त केला आहे. नाशिक विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार, अमित रासकर, अविनाश दाभाडे यांनी विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई केली.

The post नाशिकमध्ये 1 कोटी 10 लाखांचे खाद्यतेल जप्त appeared first on पुढारी.

Exit mobile version