Site icon

नाशिकला थंडीचे ‘कमबॅक’, उत्तरेकडील थंड वाऱ्यांंमुळे हवेत गारवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील गारठा वाढला आहे. वाढत्या गारठ्यासोबत नागरिकांना हुडहुडी भरली आहे. सोमवारी (दि. ६) नाशिकमध्ये किमान तापमानाचा पारा १२.५ अंशांवर, तर निफाडला ९.८ अंशांवर होता.

उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने जिल्ह्यात थंडीने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. नाशिक शहराचा पारा १० अंशांवर असला, तरी पहाटे व रात्रीच्या वेळी थंड वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. तसेच नागरिकांनी उबदार कपडेदेखील पुन्हा एकदा कपाटातून बाहेर काढले आहेत.

निफाडच्या पाऱ्यात गेल्या २४ तासांच्या तुलनेत एका अंशांची वाढ झाली असली, तरी तालुक्यात थंडीचा मुक्काम कायम आहे. वातावरणातील हा बदल रब्बीतील गहू व हरभरा पिकांसाठी पोषक असला, तरी द्राक्षबागांसाठी तो नुकसानकारक आहे. त्यामुळे द्राक्षपीक वाचविण्यासाठी बागांमध्ये पहाटेच्या वेळी धूर फवारणी करण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहेत. थंडीमुळे जिल्ह्याच्या अन्य भागांतील दैनंदिन जीवनमानावरही परिणाम झाला आहे. विशेष करून वातावरणातील सातत्याने होणारा बदल हा भाजीपाला व अन्य काही पिकांसाठी धोकादायक असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस जिल्ह्यात थंडीचा जोर अधिकच वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकला थंडीचे 'कमबॅक', उत्तरेकडील थंड वाऱ्यांंमुळे हवेत गारवा appeared first on पुढारी.

Exit mobile version