Site icon

नाशिक : अंबड परिसरातील दत्तनगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड परिसरातील दत्तनगर परिसरामध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान परिसरात गेल्या सहा महिन्यापासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मधून येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ठाकरे गट शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर यांनी केली आहे.

ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे परिसरात घसा दुखी, ताप, उलटी-जुलाब, पोटदुखी यासोबतच साथीचे आजार वाढत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आजारी पडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला लागूनच असल्यामुळे निकृष्ट दर्जाच्या चेंबर मधून पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन मध्ये ड्रेनेजचे दूषित पाणी वाहत आहे. ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन वेगवेगळ्या असाव्यात, परिसरात नवीन पाईपलाईन टाकून मिळावी जेणेकरून ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिश्रित होणार नाही अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

परिसरात पहाणी केली असता प्रचंड भयानक परिस्थिती बघायला मिळाली. तरी परिसरातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता तात्काळ पाईपलाईनची दुरुस्ती करावी व नागरिकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शरद दातीर यांनी दिला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अंबड परिसरातील दत्तनगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version