Site icon

नाशिक : अकरावीची सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2022-23 च्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत तिसर्‍या फेरीला गुरुवारी (दि.18) सायंकाळी 6 वाजेपासून प्रारंभ झाला आहे. या फेरीसाठी 14 हजार 681 जागा उपलब्ध असणार असून, येत्या सोमवारी (दि.22) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. कोटांतर्गत होणार्‍या तिसर्‍या फेरीसोबतच द्विलक्षी प्रवेश फेरी पार पडणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यामिकचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील 63 महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या 26 हजार 480 जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत दोन फेर्‍या पार पडल्या असून, 11,799 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. पहिल्या फेरीत 9, 462 तर दुसर्‍या फेरीत 2,228 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपली जागा निश्चित केली आहे. तर अद्यापही 14,881 जागा रिक्त आहे. रिक्त जागांसाठी तिसरी फेरी पार पडणार आहे.

तिसर्‍या फेरीच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना शनिवार (दि.20) पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग एक व दोन संपादित करता येणार आहे. या कालावधीत नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध असणार आहे. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना द्विलक्षी विषय प्रवेशासाठी ऑनलाइन पसंती नोंदविता येणार आहे. रविवारी (दि.21) पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून विभागीय कॅप समित्यांकडून अलॉटमेंटचे पूर्व परीक्षण केले जाणार आहे. दरम्यान, सोमवारी (दि.22) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन दिवस अर्थात बुधवार (दि.24) पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. गुरुवारी (दि.25) पुढील प्रवेश फेरीच्या रिक्त जागांची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामध्ये कॅप व कोटांतर्गत रिक्त जागांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अकरावीची सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी appeared first on पुढारी.

Exit mobile version