Site icon

नाशिक : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा –

आई – वडीलांना न सांभाळणार्‍या मुलांना ग्रामपंचायतीकडून कोणतेही दाखले अथवा योजनांचा लाभ न देण्याचा ठराव दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. सरपंच सुभाष नेहरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली.

यावेळी जानोरी गावात आई-वडीलांचा सांभाळ न करणार्‍यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी अशा मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही शासकीय दाखले न देण्याचा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ न देण्याचाही ठराव एकमताने संमत करण्यात आला.

यावेळी तलाठी किरण भोये, उपसरपंच हर्षल काठे, सदस्य गणेश तिडके, विलास काठे, गणेश विधाते, संगीता सरनाईक, सारीका केंग, विश्‍वनाथ नेहरे तसेच सोपान काठे, योगेश तिडके, कैलास पगारे ज्ञानेश्‍वर विधाते, भारत काठे, दिपक काठे, काळू तुंबडे, रमेश जाधव, नाना डंबाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी शैलेद्र नरवाडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. यावेळी जानोरी गावातील देशी दारु दुकान गावठाणाच्या बाहेर स्थलांतर करण्यासाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा चालू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गावातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी गावांतर्गत रस्ते, वाडीवस्तीवरील पथदिप बसविणे, गावपाट दुरुस्ती करणे, गावची लोकसंख्या जास्त असल्याने पाणी पुरवठ्याच्या टाकीची साठवण क्षमता कमी पडत असल्याने विभागानुसार पाण्याच्या साठवणूकीसाठी पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

त्याचबरोबर आरोग्य उपकेंद्र 1 जवळील बंधारा दुरुस्ती करण्याचा ठराव संमत करण्यात आला. गावातील सर्व सरकारी गटांची मोजणी करुन सरकारी गटांतील अतिक्रमण काढण्याबाबत ठराव करण्यात आला. सुवर्ण महोत्सव स्वातंत्रदिनानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट हर हर तिरंगा हा कार्यक्रम राबविण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवाडे यांनी केले. शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेत स्पर्धा घेण्यात येणार असून त्याचे बक्षिस वितरण दि. 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा : 

The post नाशिक : आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍यांना दाखले न देण्याचा ग्रामपंचायतीचा ठराव appeared first on पुढारी.

Exit mobile version