Site icon

नाशिक : आतुरता गौरी-गणपतीच्या आगमनाची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गौरी-गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, मूर्ती कारागिरांच्या हाताला वेग आला आहे. सध्या बहुतांश ठिकाणी मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू असून, ज्या मूर्ती तयार आहेत, त्यांचे स्टॉल्सदेखील शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारातही चैतन्य निर्माण झाले असून, गणेशभक्तांनी मूर्ती बुकिंग करण्यास सुरुवात केल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांसह देशातील प्रमुख शहरांमध्ये तसेच परदेशातही नाशिकच्या गणेशमूर्तींना तसेच सजावटीच्या साहित्यांना मोठी मागणी आहे. यंदा सर्वच गोष्टी महागल्याने मूर्तींसह सजावटीच्या साहित्यात सुमारे 20 टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. मात्र, कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा सार्वत्रिक पद्धतीने गणरायाचा उत्सव साजरा करता येणार असल्याने, गणेशभक्तांकडून दरवाढीचा फारसा विचार केला जाणार नाही, असेच काहीसे चित्र आहे. त्यामुळे मूर्तिकारांबरोबरच विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. गणेशमूर्ती घडविताना मागील दोन वर्षांपासून मूर्तिकार तोटा सहन करीत आहेत. यंदा कोरोनाचे सावट बर्‍यापैकी कमी झाल्याने, यंदाचा उत्सव जल्लोषात व्हावा, अशी अपेक्षा मूर्तिकारांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्वच किंमती वाढल्या

वाढलेली मजुरी, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली 10 टक्के वाढ, रंगांची 25 टक्के वाढ, इमिटेशन ज्वेलरीची 20 टक्के वाढ यामुळे गणेशमूर्तीची किंमत यंदा 20 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध करून देण्यात आल्याने, बाजारात चैतन्य असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गौरींच्या आगमनाची तयारी

गणेशोत्सवातच गौरींचे आगमन होत असल्याने, सध्या गौरीच्या आगमनाचीदेखील जोरदार तयारी केली जात आहे. त्याकरिता बाजारात खरेदीचा जोर वाढल्याने, बर्‍यापैकी उलाढाल होत आहे. विक्रेत्यांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होणार असून, बाजारपेठही सजली आहे.

सध्या शहरातील बहुतांश भागांमध्ये गणेशमूर्तींचे स्टॉल्स सजले असून, सुंदर आणि सुबक मूर्ती भक्तांना आकर्षित करीत आहेत. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्तीदेखील बाजारात आणल्या जाणार आहेत. या मूर्ती पीओपीच्या तुलनेत महाग असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून आतापासूनच उपलब्ध असलेल्या मूर्ती बुक करण्यास प्राधान्य दिले जात आहे. विक्रेत्यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत बर्‍याच मूर्तींची विक्री झाली नाही. त्यामुळे या स्टॉकच्या मूर्ती बाजारात आणल्या जात असून, त्यास गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : आतुरता गौरी-गणपतीच्या आगमनाची appeared first on पुढारी.

Exit mobile version