Site icon

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भिंतीवर अवतरल्या 65 वर्षांपूर्वीच्या नोटा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

साधारणत: वीस वर्षांपूर्वी एक, दोन, पाच, वीस रुपयांच्या जुन्या नोटा चलनात हमखास दिसायच्या. या नोटा आजही अनेक आजी-आजोबांच्या बटव्यात जुन्या स्मृती म्हणून जपून ठेवलेल्या आहेत. परंतु या नोटा नाशिकररांच्या पुन्हा भेटीला आल्या आहेत. करन्सी नोटप्रेसने यासाठी भन्नाट असा पुढाकार घेतला आहे. जेलरोड परिसरात करन्सी नोटप्रेसच्या भिंतीवर 1955 पासूनच्या जुन्या दुर्मीळ नोटांचे अतिशय सुंदर अशी चित्रे अवतरली आहेत. त्यामुळे प्रेसच्या भिंतीजवळ या नोटांचे दर्शन घेण्यासाठी नाशिककरांची झुंबड उडत आहे.

नाशिकरोड परिसरात इंग्रजांच्या काळातील नोटप्रेस आहे. संपूर्ण देशात हा नोटप्रेस प्रसिद्ध आहे. जेलरोड परिसरात रस्त्यालगत असलेल्या नोटप्रेसची मोठी लांबलचक भिंत आहे. या भिंतीवर प्रेस व्यवस्थापनाने 1955 पासूनच्या काही दुर्मीळ नोटांचे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली आहे. नोटांच्या जोडीला महाराष्ट्राची संस्कृती असलेले चित्रही रेखाटलेले आहे. एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस आणि पन्नास रुपये अशा मूल्य असलेल्या नोटांचे चित्र भिंतीवर झळकले आहेत. त्यामुळे नाशिकरोडच्या प्रेसची चर्चा आता सामान्य नागरिकांमध्येही केली जाऊ लागली आहे.

नोटांचे चित्र रेखाटल्यामुळे भिंत अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसून येत आहे. प्रेसच्या या उपक्रमाचे सामान्य नागरिकांनी कौतुक केले आहे. प्रेसचा हा उपक्रम यापूर्वीच राबवायला हवा होता, असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. प्रेसची भिंत चार ते पाच किलोमीटर अंतराची गोलाकार भिंत आहे. मात्र, रहदारीच्या रस्त्यालगत असलेल्या प्रदर्शनीय भिंतीवर हे चित्र रेखाटल्याचे दिसते. नोटांप्रमाणेच बैलगाडी, कुस्ती, शेतकरी आदी विविध प्रकारची चित्रेही आहेत.

जेलरोड येथील प्रेसमुळे संपूर्ण भारतात नाशिक शहर नावारूपाला आलेले आहे. प्रेसच्या समोरून अनेक नागरिक ये-जा करीत असतात. त्यांना येथील नोटप्रेसचे महत्त्व कळावे, यासाठी दुर्मीळ नोटांचे चित्र काढण्यात आले आहे.

– जगदीश गोडसे, जनरल सेक्रेटरी, प्रेस मजदूर संघ

 

एक रुपयांची नोट
दहा रुपयांची नोट
वीस रुपयांची नोट

दोन रुपयांची नोट
पाच रुपयांची नोट

(सर्व फोटो – उमेश देशमुख)

हेही वाचा :

The post नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भिंतीवर अवतरल्या 65 वर्षांपूर्वीच्या नोटा appeared first on पुढारी.

Exit mobile version