Site icon

नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवार (दि. 24)पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी गर्दी विचारता घेऊन तहसील प्रशासनाने तयारी केली आहे.

राज्यातील पर्जन्याचे कमी क्षेत्र असलेल्या 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी आणि कळवण या तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गेल्या शुक्रवारी (दि. 19) तहसीलदारांनी निवडणुकीची अधिसूचना स्थानिक स्तरावर प्रसिद्ध केली. त्यानंतर पुढील टप्प्यात बुधवार (दि. 24)पासून अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी 1 सप्टेंबरला दुपारी 3 पर्यंतची अंतिम मुदत असणार आहे. 2 तारखेला दाखल अर्जांची छाननी, तर 6 तारखेला दुपारी 3 पर्यंत माघारीसाठीची वेळ देण्यात आली आहे.

पॅनलसाठी जुळवाजुळव

राज्यातील सत्तासंघर्षानंतर ग्रामपंचायतींमधील निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत. गावपातळीवर नाती-गोती व अन्य विचार करून पॅनल करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी उमेदवारांची जुळवाजुळव करण्यावर भर दिला जात आहे.

राजकारण तापायला सुरुवात

माघारीनंतर त्याच दिवशी निवडणुकीच्या अंतिम रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वितरण केले जाणार आहे. त्यानंतर 18 सप्टेंबरला मतदान व दुसर्‍या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान, इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरण्याकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे गावपातळीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ग्रामपंचायतीसाठी आजपासून नामनिर्देशन, तीन तालुक्यांतील 88 ग्रामपंचायती appeared first on पुढारी.

Exit mobile version