Site icon

नाशिक : ग्रामीण महिलांच्या आरोग्याचे निदान करण्यासाठी ‘युरिन टेस्ट किट’

नाशिक : वैभव कातकाडे

जिल्ह्यातील आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी विशेषत: महिलांच्या आरोग्याबाबत जिल्हा परिषदेमार्फत पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आता आजाराचे निदान करण्यासाठी युरिन टेस्ट किट वापरण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे करार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी व्टिटद्वारे त्यांनी माहिती दिली होती.

तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरी वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल येण्यास विलंब लागत आहे. त्याचा परिणाम रुग्णाला नक्की काय आजार आहे, याचे निदान होण्यास लागत असल्याने कधी महिलांना मृत्यूचादेखील सामना करावा लागत आहे. मात्र, आता लवकरच त्यातून सुटका होणार आहे. महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी आणि जिल्हा परिषद करत असलेल्या कराराद्वारे अवघ्या ३० सेकंदांमध्ये ‘युरिन टेस्ट’ च्या आधारे पाच प्रमुख चाचण्यांचे निकाल हाती येणार आहेत.

महाराष्ट्र इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून हा करार होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, यासाठी महाराष्ट्र इनोव्हेशन सेंटर मदतनिधी देणार आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ग्रामीण भागात हे युरिन किट पोहोचणार असून, त्यासाठीचे प्रशिक्षण वैद्यकीय विभागाला देण्यात येणार आहे.

काय आहे किटमध्ये

युरिन टेस्टिंग किटमध्ये ‘वेलनेस केअर किट’, ‘युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन’, ‘मॅटर्निटी वेलनेस किट’, ‘एल्डरली केअर किट’ आणि ‘किडनी केअर किट’ असे पाच प्रकार आहेत. निओडॉक्स या स्टार्टअपने हे किट सादर केले आहे. या किटच्या माध्यमातून यकृत, फुफ्फुस, युरिनरी ट्रॅकसारखे महत्त्वाच्या अवयवांचा तपशील अवघ्या ३० सेकंदांत कळणार आहे. युरिन स्ट्रिप्स मोबाइलसमोर स्कॅन केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांत मोबाइलवर चाचणीचा निकाल हाती येईल. या आधारे उपचार घेणे रुग्णांना सोपे जाणार आहे.

महाराष्ट्र इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून निओडॉक्स या स्टार्टअपने तयार केलेले किट अतिशय उपयुक्त असतील. त्यादृष्टीने आपल्या जिल्ह्यात त्याचा प्रभावी वापर होण्यासाठी त्यांच्यासोबत करार करण्यात येत आहे. अत्यल्प दरात ही सुविधा ग्रामीण जनतेसाठी उपलब्ध करून देता कशी येईल यादृष्टीने आमची बोलणी सुरू आहे.

– आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

हेही वाचा :

The post नाशिक : ग्रामीण महिलांच्या आरोग्याचे निदान करण्यासाठी 'युरिन टेस्ट किट' appeared first on पुढारी.

Exit mobile version