Site icon

नाशिक : चेनस्नॅचर्ससह चोरीचे सोने विकत घेणा-या सोनाराला ठोकल्या बेड्या

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
सातपूर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडणाऱ्या २८ वर्षीय चैन स्नॅचरसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या ३३ वर्षीय सोनारास सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत सातपूर पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

चंद्रकांत केदारे (२८) असे चेन स्नॅचरचे नाव असून कृष्णा दिलीप टाक (३३) असे चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराचे नाव आहे. सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत कौतिक केदारे याने भर दिवसा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याचा धडाका लावला होता. श्रमिकनगर परिसरात लागोपाठ तीन दिवस महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ३० ऑगस्ट रोजी राधाकृष्णनगर चौकातून मुलांना शाळेत  सोडण्यासाठी पायी जाणाऱ्या प्राची पुरुषोत्तम बाबर या महिलेच्या गळ्यातील ३३ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्याने ओरबाडली होती.

सातपूर परिसरात चंद्रकांत केदारे याने तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोने ओरबडले असून पोलीसांनी सापळा रचून त्याला मुद्देमाल तसेच चोरीत वापरलेली मोटर सायकल जप्त करुन अटक केली. त्याच्याकडून अजूनही सात ते आठ गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख,  सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्हीचे बारकाईने निरीक्षण केले. सोनसाखळी चोराने परिधान केलेले कपडे व त्याच्याकडे लाल काळ्या रंगाचे हेल्मेट, तसेच होंडा शाईन मोटरसायकल व टाकीला लाल पट्टे असल्याचे निष्पन्न झाले होते. डी. बी. पथकाच्या तीन टीम श्रमिकनगर, कार्बन नाका व राधाकृष्णनगर भागात संशयिताचा शोध घेण्यासाठी कार्यरत होत्या. याचवेळी श्रमिक नगर मधील हिंदी शाळेच्या परिसरात वरील वर्णनाचा संशयित डी.बी. पथकातील कर्मचारी विनायक आव्हाड व सागर गुंजाळ यांना दिसला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताच तो जोरात पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देतानाच श्रमिकनगर मधील निर्मित लाईफ फेज येथे राहणाऱ्या कृष्णा दिलीप टाक या सोनारासह सोने विक्री केल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : चेनस्नॅचर्ससह चोरीचे सोने विकत घेणा-या सोनाराला ठोकल्या बेड्या appeared first on पुढारी.

Exit mobile version