Site icon

नाशिक : जगप्रसिद्ध बाळ येशू यात्रोत्सव आजपासून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील जगप्रसिद्ध बाळ येशूची यात्रा शनिवारी (दि.११) आणि रविवारी (दि.१२) भरणार आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारातील बाळ येशू मंदिरात ही यात्रा दरवर्षी भरते. त्यासाठी देश-विदेशातून भाविक मेणबत्ती लावून नवस बोलतात, नवसपूर्ती करतात. मंदिराच्या आवारात पिलग्रिम आणि रिट्रीट हाउस सभागृहात मिळून दोनशे भाविकांची सोय करण्यात आली आहे.

शाळेच्या मैदानात मिसासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. पूजेच्या वस्तू, शीतपेयी, शोभिवंत व अन्य वस्तूंची तसेच फळांची दुकाने लागली आहेत. यात्रेसाठी फादर एरोल फर्नांडिस, फादर अगस्तीन डिमेलो, फादर टेरी, फादर बॉस्को, फादर टोनी, फादर लोबो आणि त्यांचे सहकारी यात्रेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत आहेत. पोलिस व महापालिका प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. भाविकांना यात्रास्थळी येण्यासाठी सिटीबस लिंकची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भाविक रेल्वेने येतात. शनिवारी सकाळी अकराला नाशिक धर्मप्रांताचे महागुरू बिशप ल्युडस डॅनिएल यांच्या प्रमुख उपस्थितीत मिसा (प्रार्थना) होईल. याच दिवशी पहाटे सहा ते सायंकाळी सात या दरम्यान दर तासाला इंग्लिश, मराठी, कोकणी, तामिळ व अन्य भाषांमध्ये मिसा होईल. गोवा, तमिळनाडू आदी ठिकाणांहून फादर्स, सिस्टरही येणार आहेत. नाशिकरोडची हॉटेल्स बुक झालेली आहेत. कोरोना संकटामुळे दोन वर्षे यात्रा भरली नव्हती. यंदा देश-विदेशातून लाखो भाविक येणार असल्याने मंदिर प्रशासन, वाहतूक आणि उपनगर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. मंदिरात दर्शनासाठी बॅरिकेडिंग, खासगी सुरक्षारक्षक, सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून चौकशी व माहिती कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नेहरूनगरला पार्किंगची व्यवस्था

नाशिक-पुणे महामार्ग यात्रा कालावधीत बंद ठेवून टाकळी, जेलरोडमार्ग वाहतूक वळवली जाते. यंदा परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. नेहरूनगर, जेतवननगर येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ३० ते ३५ अधिकारी व पोलिस वाहतुकीचे नियोजन करत आहेत. तर कायदा सुव्यवस्थेसाठी उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जगप्रसिद्ध बाळ येशू यात्रोत्सव आजपासून appeared first on पुढारी.

Exit mobile version