Site icon

नाशिक : जिल्हा रुग्णालयातच दूषित पाणीपुरवठा, रुग्णांसह नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा रुग्णालयातील पाणी दूषित असल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाला केल्या आहेत.

राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने फेब्रुवारी महिन्यात जिल्हा रुग्णालयातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. पाण्याची तपासणी केली असता, त्यात २० टक्के पाणी नमुने दूषित आढळल्याची गंभीर बाब समोर आली. दूषित पाण्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातलगांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने प्रयोगशाळा उपसंचालक मनोहर धूम यांनी मार्च महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सकांना उपाययोजना करण्यास सांगितल्या. रुग्णालयातील रुग्ण व नातलग रुग्णालयाच्या आवारातीलच जलकुंभाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र या जलकुंभाची नियमित साफसफाई होत नसल्याची गंभीर बाब या तपासणीतून समोर आली होती. त्यामुळे जलकुंभाची तातडीने साफसफाई करून नियमित साफसफाईसह रुग्ण व त्यांच्या नातलगांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून सूचनांचे पालन न केल्यास दूषित पाण्यामुळे साथरोगाचा फैलाव झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा रुग्णालयाचीच असेल, अशीही तंबी उपसंचालक धूम यांनी दिली आहे.

जिल्हा रुग्णालयातील जलकुंभाची नियमित साफसफाई केली जाते. फेब्रुवारीत पाण्याचे नमुने सदोष आले होते. त्यानंतर तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा नमुने तपासले असता ते सामान्य आले आहेत. यापुढे नियमित दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

– डॉ. उत्कर्ष दुधेडिया, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक.

सुचविलेल्या उपाययोजना

– पाणी साठवणुकीच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ करून त्याची नोंद वहीत ठेवावी.

– पाणीपुरवठ्यातील क्लोरिनचे प्रमाण तपासून घ्यावे. क्लोरिनचे प्रमाण कमी असल्यास ब्लिचिंग पावडर किंवा मेडिक्लोरने पाण्याचे शुद्धीकरण करावे.

– पाण्याचे नमुने पिण्यायोग्य नसल्यास त्यावर उपाययोजना करून पाणी नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवून खात्री करावी.

हेही वाचा : 

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयातच दूषित पाणीपुरवठा, रुग्णांसह नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Exit mobile version