Site icon

नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असताना सद्यस्थितीत लहान-मोठ्या जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतका चारा शिल्लक आहे. भविष्यात चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी पाणी असलेल्या भागात शेतकऱ्यांच्या सहाय्याने चारा लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत.

मान्सूनचे तीन महिने सरले तरीही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.२९) जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत चाऱ्यासंदर्भातील माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील जनावरांसाठी महिन्याकाठी १ लाख ८० हजार ८०० मेट्रिक टन चाऱ्याची गरज भासते. सध्या जिल्ह्यात सर्व प्रकारचा मिळून ८ लाख ५२ हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध असून, त्यात वन विभागाकडील चाऱ्याचा समावेश आहे. हा चारा सहा महिने पुरेल. मात्र, टंचाईचे संभाव्य संकट लक्षात घेता प्रशासनाने पाणीसाठा असलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांच्या मर्यादेत बियाणे उपलब्ध करून देत चारा लागवड केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांकडूनच हा चारा शासन खरेदी करणार आहे.

पशुसंवर्धन विभागाने राज्यस्तरावरून १ लाख ३२ हजार किलो चाऱ्यासाठीचे बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. त्यापैकी 32 हजार किलो बियाणे अद्याप उपलब्ध हाेणे बाकी आहे. पशुसंवर्धन विभागाने मागणी केलेल्या बियाणांमध्ये २६ हजार ४५८ किलो मका, २४५० किलो शुगर ग्रेस व १२५८ न्यूट्रिफीड चाऱ्याच्या बियाणांची मागणी नोंदविली आहे. हे बियाणांद्वारे ३ लाख मेट्रिक टन चारा ४५ ते ५० दिवसांत उपलब्ध हाेईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

चारा वाहतुकीवर बंदी

जिल्ह्यातील वनविभागाच्या क्षेत्रावरील ५७ हजार ११४ मेट्रिक टन चाऱ्यासह अन्य ठिकाणचा चारा परजिल्हा व राज्याबाहेर वाहतुकीस बंदी लादण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. दोनच दिवसांत त्यासंदर्भात आदेश काढले जाणार आहेत. गरज भासल्यास जिल्हा नियोजनच्या निधीतून पालघर व विक्रमगड येथील डाेंगरमाथ्यावरील चाऱ्याचे ७५ किलोचे गठ्ठेही विकत घेण्याची तयारी पशुसंवर्धन विभागाने केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक appeared first on पुढारी.

Exit mobile version