Site icon

नाशिक : डोक्यात कुऱ्हाड घालून युवकाचा खून, संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मागील भांडणाची कुरापत काढून शेतात झाड तोडण्यासाठी जात असलेल्या ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत त्याला ठार केल्याची घटना तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी गावातील खुंटवड बाबा वस्ती येथे घडली. बहादूरसिंग नारायणसिंग परदेशी (७०) यांनी फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी गावातील खुंटवड बाबा वस्ती येथे बहादूरसिंग नारायणसिंग परदेशी (७०) व केदू बाबूराव कडाळे हे शेजारी राहतात. त्यांच्यात नेहमी भांडणे होतात. दि. ४ जून रोजी सचिन बहादूरसिंग परदेशी (३५) याने मीराबाई बाबूराव कडाळे यांना शिव्या दिल्याने भांडण झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सचिन कुऱ्हाड घेऊन शेतात झाडे तोडण्यासाठी जात होता. त्यावेळी मीराबाई यांचा पुतण्या स्वप्निल विश्वनाथ कडाळे (३२) याने सचिनला जाब विचारत शिवीगाळ केली, तसेच सचिनच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून घेत त्याच्या डोक्यात वार केले. त्यामुळे सचिन जागीच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घाबरलेल्या स्वप्निलने घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीचा शोध घेतला. पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी स्वप्निल कडाळे याला सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी अटक केली. संशयित आरोपीला चांदवड न्यायालयात नेले असता, न्यायाधीश माने यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : डोक्यात कुऱ्हाड घालून युवकाचा खून, संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Exit mobile version