Site icon

नाशिक : तरुणाला रोलेट गेमचा नाद, हरलेले पैसे फेडण्यासाठी घरातून 7 लाख घेऊन पळाला

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

ऑनलाइन रोलेट गेमच्या नादी लागून सातपूरच्या एका तरुणाने थेट घरातील बांधकाम कामासाठी जमवलेली सात लाख रुपयांची रोकड घेऊन पळून गेल्याची घटना सातपूर परिसरात घडली आहे. रोलेट चालवणाऱ्यांवर कारवाई करत मुलाचा शोध लागावा यासाठी आज बुधवारी (दि.२) घरातून पळून गेलेल्या तरुणाच्या पालकांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार वजा अर्ज केला आहे.

वामन महादू सरोदे (रा. सातपूर ) यांचा मुलगा सोमनाथ सरोदे हा रोलेट गेमच्या आहारी गेला आहे. रोलेटगेममुळे त्याच्यावर प्रचंड कर्ज झाल्यामुळे त्याने घरातून घर बांधकामासाठी जमवलेली ७ लाख रुपयाची रक्कम घेऊन तो बेपत्ता झाला आहे. यासंदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही देण्यात आली. मात्र सातपूर पोलिस सोमनाथला अद्याप शोधू शकले नाहीत.

ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यावर चाप बसवण्यात थोड्याफार प्रमाणात यश मिळवले असले तरी मात्र रोलेट सारख्या ऑनलाइन गेमने मात्र डोके वर काढले आहे. गुन्हेगारांचे आश्रयस्थान आणि गुन्हे घडण्यासाठी प्रवृत्त करणारा हा रोलेट गेम शहर व ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिचून सर्रास सुरु आहे. गंभीर बाब म्हणजे असंख्य तरुणांचे आयुष्य या ऑनलाईन जुगारामुळे उद्ध्वस्त झाले आहे. अवैध धंद्यावर चाप बसवण्याचा विडा उचलणाऱ्या ग्रामीणसह नाशिक पोलीस आयुक्त  यावर काय कारवाई करता याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

The post नाशिक : तरुणाला रोलेट गेमचा नाद, हरलेले पैसे फेडण्यासाठी घरातून 7 लाख घेऊन पळाला appeared first on पुढारी.

Exit mobile version