Site icon

नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्यातील नगरसूलसह तालुक्यातील इतर कृषिनिविष्ठा विक्रेत्यांना कृषी विभागाचा अधिकारी आहे, असे भासवून दुकाने तपासणीच्या नावाखाली पैशांची मागणी करणार्‍या तोतयाला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. हा संशयित बाळापूर येथील आहे. नगरसूलच्या योगेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय गाडे यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय गाडे यांना 8 ऑगस्टला संशयित बबन लक्ष्मण शिरसाठ (रा. धनकवडी रस्ता, बाळापूर) याने मोबाइलवरून आपण कृषी विभागाचे अधिकारी रमेश शिंदे बोलत असून, आपण आपल्या केंद्रात खते ठेवतात का, परवाना आहे का, कच्च्या नोंदी आपण ठेवतात का, अशी विचारणा केली. कृषी अधिकारी बोलत असल्याने गाडे यांनी साधारणपणे उत्तरे दिली. त्यावर या तोतयाने तुमच्या कृषी सेवा केंद्राची तपासणी केली तर तुम्ही गोत्यात याल, तुमचा परवाना रद्द होईल, माल जप्त होईल असा दम दिला. तसे होऊ द्यायचे नसेल तर तीन हजार रुपये पाठवा, अशी गाडे यांच्याकडे मागणी केली. तसेच गाडे यांना फोन पे नंबर देऊन त्यावर पैसे पाठवायला सांगितले. गाडे यांनी पैसे पाठविल्यानंतर काही दिवसांनंतर विविध कृषी सेवा केंद्रचालक प्रभाकर जनार्दन ठाकूर (ठाकूर कृषी सेवा केंद्र, खैरगव्हाण), गोरख राजाराम कोल्हे (रा. हडपसावरगाव, अथर्व कृषी सेवा केंद्र, नगरसूल) अशोक रामदास पवार (सर्वज्ञ कृषी सेवा केंद्र, नगरसूल) यांनादेखील या तोतया अधिकार्‍याने कृषी अधिकारी शिंदे यांचे नाव सांगत फोन करून पैशांची मागणी केली. जिल्हा परिषदेतील कृषी विभागाला या घटनेबाबत माहिती दिली असता, तेथे रमेश शिंदे हे कृषी विकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे समजले.

तथापि त्यांनी कोणालाही फोन केलेला नसल्याचे शिंदे या अधिकार्‍याने सांगितले. विभागीय कृषी संचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्या सूचनेनुसार कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे व मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर कृषिनिविष्ठा विक्रेते यांनी संजय गाडे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना तोतया अधिकारी बबन शिरसाठ यांच्याकडे दोन मोबाइल फोन, इतर वेगवेगळी सहा सीमकार्ड्स व एक आधारकार्ड व ई-श्रमकार्ड मिळून आले.

हेही वाचा :

The post नाशिक : तोतया कृषी अधिकारी पकडला appeared first on पुढारी.

Exit mobile version