Site icon

नाशिक : थेट रस्त्यावरील चिखलात भात लागवड करुन निषेध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ग्रुप ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना अतिशय दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून मार्गस्थ व्हावे लागते. यंदाही पावसामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, ग्रामीण भागात तर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात झाले आहेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिरवाडे गावातील ग्रामस्थांनी थेट रस्त्यावरील चिखलात भात लागवड करत निषेध नोंदविला.

दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जिरवाडे, मांदाणे, चामदरी, पायर पाडा, गोलदरी ही गावे येतात. आदिवासी भागात पायाभूत सुविधांचा अभाव ही लोकप्रतिनिधींची सातत्याने ओरड असते. आदिवासी भागाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला जातो. मात्र, आदिवासी गावांमध्ये विकासगंगा पोहोचली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्यात आदिवासी बांधवांना दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागते.

जिरवाडे गावात गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम मंजूर असल्याचे सांगितले जाते. दर पावसाळ्यामध्ये, यंदा त्रास सहन करा, पुढच्या वर्षी काम मार्गी लागेल, असे आश्वासन दिले जाते. रस्त्याचे काम होईल, या भाबड्या अपेक्षेने येथील नागरिक चिखलातून वाट तुडवत प्रवास करत असतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या भागातील रस्त्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अखेर याचा निषेध नोंदवत जिरवाडे ग्रामस्थांनी या खराब रस्त्यांवरील चिखलात भात लागवड करत निषेध नोंदविला.

हेही वाचा :

The post नाशिक : थेट रस्त्यावरील चिखलात भात लागवड करुन निषेध appeared first on पुढारी.

Exit mobile version