Site icon

नाशिक : दोन अपंगांच्या अनोख्या प्रेम विवाहाची कहाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आपल्या सभोवताली अनेक प्रेमविवाह होत असतात, पण सिन्नर तालुक्यात नुकताच एक आगळावेगळा विवाहसोहळा उजनी गावात झाला. शिक्षणाच्या ओढीने शाळेत जाणाऱ्या ‘त्या’ दोघांची मैत्री होते… मग प्रेम आणि त्या कथेचा शेवट प्रेमविवाहात झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

आगळ्यावेगळ्या कथेचे प्रमुख नायक आणि नायिका आहेत जालिंदर आणि सारिका… जन्मत:च अपंग असले तरी दोघांना शिक्षणाची ओढ होती. काहीही झाले तरी आपण शिक्षण पूर्ण करायचे ही जिद्द त्यांनी ठेवली अन् मग सुरू झाला शिक्षणाचा रोजचा प्रवास. दोघांची घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे दररोज कुणी शाळेत सोडणे अशक्यच होते. वाहन व्यवस्था तर दूर की बात. पण म्हणतात ना, की इच्छा असेल तिथे हमखास मार्ग निघतोच… तसेच इथे घडले आणि दोघांनी दररोज चप्पल हातात घालून सरपटत का होईना शाळेत जाण्याचा निश्चय केला. दोघांनीही जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. शाळेत शिकत असताना ओळख-मैत्री, प्रेम आणि नंतर विवाह असा प्रवास सुरू झाला. दोघांच्या आयुष्याने जणू काही गगनभरारी घेतली.

३० जूनला दोघांनी अगोदर न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि त्यानंतर खर्चाला कात्री लावत गावात अगदी साधेपणाने हा विवाहसोहळा केला. विवाहाप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हा चिटणीस समाधान बागल, नाशिक शहरप्रमुख श्याम गोसावी, सिन्नर तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अरुण पाचोरकर आदींसह नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : दोन अपंगांच्या अनोख्या प्रेम विवाहाची कहाणी appeared first on पुढारी.

Exit mobile version