Site icon

नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

सचिन बैरागी

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा

आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टी उभारली जात असून, सध्या नियोजित जागेवर प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. शिवसृष्टीमुळे नांदगावच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शहरातील शिवसृष्टीचे नूतनीकरण झाले होते. त्यावेळी कांदे यांनी लवकरच भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात येईल, असा शब्द नांदगावकर आणि छत्रपती संभाजीराजे यांना दिला होता. या शिवसृष्टीसंदर्भात कांदे यांनी सातत्याने पाठपुरावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसृष्टीचे ऑनलाइन भूमिपूजन केले होते. या शिवसृष्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा २९ फूट उंचीचा पूर्णाकृती ब्राँझचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात येणार आहे. तसेच शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि पारंपरिक वारसा आदींचा शिवसृष्टीत समावेश असणार आहे. तसेच काही म्युरल्सही तयार केले जाणार आहे. शिवसृष्टीमध्ये शिवचित्रपटगृह उभारले जाणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट दाखविले जाणार आहेत.

कारंजासह नैसर्गिक हिरवळीचे देखणे उद्यानदेखील बनविण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी शिवभोजनालय राहणार आहे. शिवसृष्टीमुळे नांदगावसह तालुक्याची एक अगळवेगळी ओळख निर्माण होणार आहे. शिवसृष्टीचे काम कधी पूर्ण होईल, याची उत्सुकता शिवप्रेमींसह नांदगावकरांमध्ये दिसून येत आहे.

शिवसृष्टी संकल्प चित्र

शिवसृष्टीची ठळक वैशिष्ट्ये

●भव्य प्रवेशद्वार

●संग्रहालय प्रवेशद्वार

●महाराजांचा २९ फूट उंचीचा पूर्णाकृती ब्राँझ अश्वारूढ पुतळा

●कारंजासह नैसर्गिक हिरावळीचे देखणे उद्यान

●शिवकालीन ऐतिहासिक प्रतिकृतीचे संग्रहालय

●शिवाजी महाराजांच्या चरित्रावर वाचनालय

●शिवचित्रपटगृह

●शिवभोजनालय

●शिवचित्र संग्रहालय

शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असून, शिवसृष्टी बांधणे हे माझे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होतो. शिवसृष्टीमुळे नांदगावची आगळीवेगळी ओळख निर्माण होईल.

-सुहास कांदे, आमदार

 

शिवसृष्टी : संकल्पचित्र

हेही वाचा :

The post नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर appeared first on पुढारी.

Exit mobile version