Site icon

नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी ‘नियंत्रणात’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तक्रार गांभीर्याने घ्यावी. तक्रारींचे स्वरूप पाहून गुन्हे दाखल करून संशयितांवर कारवाई करावी. तक्रारदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी- अंमलदारांची नियंत्रण कक्षात बदली केली जाईल, अशी इशारावजा सूचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिसांनी दिली आहे. यामुळे दाखल गुन्ह्यांची संख्या वाढली तरी तक्रारदारांना न्याय मिळेल व गुन्हेगारांवरच वेळीच वचक बसवता येईल, असा विश्वास शिंदे यांनी वर्तवला आहे.

शहरात सर्व आलबेल असल्याचे चित्र उभारण्यासाठी अनेकदा गुन्हे दाखल केले जात नसल्याचा तसेच तक्रारदार गुन्हेगारांविरोधात तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत असतो. त्यामुळे मोबाइल, वाहन चोरीसह इतर गुन्हे दाखलच केले जात नसल्याच्या तक्रारी असतात. गुन्हे दाखल होत नसल्याने गुन्हेगारांवर कारवाई करण्यात अडचणी येतात व भविष्यात कारवाईचा धाक न राहिल्यास संबंधित गुन्हेगार अट्टल गुन्हेगार बनण्याचा धोका निर्माण होतो. वेळीच कारवाई केल्यास गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहतो. त्यामुळे तक्रार आल्यानंतर आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करून संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अशी सूचना शिंदे यांनी शहरातील पोलिस ठाण्यांमधील अधिकारी व अंमलदारांना दिली आहे. पोलिस आयुक्त शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची नोंद घेत गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर योग्य तपास करून आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, मोक्कानुसार कारवाई करावी. तक्रारींचा निपटारा तातडीने करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. या सूचनांमुळे मागील तक्रारींची चौकशी करीत गुन्हे दाखल केले जात असल्याचे चित्र आहे.

नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्याची नोंद घेणे किंवा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. पोलिसांनी सहकार्य न केल्यास संबंधित तक्रारदारांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा. गुन्हा दाखल झाल्यास आरोपींवर कायद्याचा वचक राहतो. गुन्हेगारांची माहिती संकलित होते, प्रतिबंधात्मक कारवाईमुळे किंवा शिक्षा झाल्यास तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार नाही. – अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.

हेही वाचा:

The post नाशिक : नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास पोलिस अधिकारी-कर्मचारी 'नियंत्रणात' appeared first on पुढारी.

Exit mobile version