Site icon

नाशिक : नातवाकडून पैशासाठी आजी-आजोबाची हत्या

 नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील वेरूळे येथील वृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीच्या घावाने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हत्याकांडानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत रात्री उशिरा ताब्यात घेतलेला नातू काळू कोल्हे हा खरा मारेकरी असल्याचे उघड झाले. कौटुंबिक वादातून व पैशांच्या मागणीतून सदर हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वेरूळे येथील वयोवृद्ध दाम्पत्य नारायण कोल्हे व सकूबाई कोल्हे यांची हत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकाराने परिसरात एकच घबराट उडाली. पोलिसांनी कोल्हे दाम्पत्याबरोबर नेहमी राहणारा त्यांचा भाचा रामदास भोये याची चौकशी करताना आजी-आजोबांना भेटण्यासाठी वरखेडा येथील त्यांचा नातू काळू हा येऊन गेला होता, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत काळू कोल्हे याची चौकशी केल्यानंतर त्यानेच आजी-आजोबांचा खून केल्याचा कबुली दिली.

कौटुंबिक वाद आणि पैशांच्या मागणीतून त्याने ही हत्या केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याबाबत अधिक तपास अभोणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत. दरम्यान, आजी-आजोबा व नातूच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे कळवण आदिवासी पश्चिम पट्ट्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : नातवाकडून पैशासाठी आजी-आजोबाची हत्या appeared first on पुढारी.

Exit mobile version