Site icon

नाशिक : पठ्ठ्याने साडेतीन लाखांना घेतली बैलजोडी, सौदा पावती व्हायरल

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात बुधवारी (दि. 17) एका पांढर्‍या रंगाच्या खिल्लारी बैलजोडीचा व्यवहार तब्बल तीन लाख 51 हजार रुपयांमध्ये झाला. बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वोच्च विक्रमी व्यवहार ठरला असून, यामुळे साहजिकच भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली नसती, तरच नवल!

बागलाण तालुक्यातील नामपूर बाजार समिती ही बैल बाजारासाठी उत्तर महाराष्ट्रात ख्यातकीर्त आहे. दर बुधवारी याठिकाणी बैलांचा बाजार भरतो. अलीकडे यांत्रिकीकरण आणि बैलजोड्यांच्या वाढत्या किमतींमुळे बैल बाजाराचे महत्त्व ओसरले असले, तरी नामपूर येथे तुलनेने मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री व्यवहार होतात. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील बैल विक्रेते या ठिकाणी आपले बैल आणतात तसेच खरेदीसाठीही राज्यभरातील शेतकरी हमखास एकदा तरी नामपूरचा बाजार अनुभवतात. बुधवारी मालेगाव तालुक्यातील गाळणे येथील भास्कर रत्नाकर सोनवणे यांनी पांढर्‍या रंगाची खिल्लारी बैलजोडी विक्रीसाठी आणली होती. अतिशय उंच, धिप्पाड आणि देखण्या बैलजोडीच्या खरेदीसाठी असंख्य शेतकर्‍यांनी इच्छा दर्शविली. परंतु, किमतीमुळे मात्र भल्याभल्यांना आपल्या अपेक्षांना मुरड घालावी लागली. अखेर कळवण तालुक्यातील पाडगण येथील बाळू विष्णू बागूल या शेतकर्‍याने तीन लाख 51 हजार रुपयांची बोली स्वीकारून ही खिल्लारी बैलजोडीची शेल आपल्या हाती घेतली.

नामपूर बाजार समितीच्या बैल विक्रीच्या व्यवहारातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रमी दर ठरला आहे. साहजिकच विक्रमी सौदा झालेली ही बैलजोडी पाहण्यासाठी व मोबाइलमध्ये तिची छबी कैद करण्यासाठी अक्षरश: गर्दी उसळली होती. खरेदीदार मालकाने ढोल-ताशाच्या गजरात ही बैलजोडी बाजार समितीतून बाहेर काढली.

बैलजोडी अन् सौदा पावती व्हायरल
अलीकडे बैलजोडींच्या किमती गगनाला भिडल्या असल्या, तरी एखाद्या वाहनाच्या तुलनेत तब्बल साडेतीन लाख रुपयांना बैलजोडी खरेदी झाल्याचा हा पहिलाच अनुभव असून त्यामुळे या बैलजोडीच्या छायाचित्रासह विक्रीची पावती कसमादे परिसरातील सोशल मीडियातून कमालीची व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पठ्ठ्याने साडेतीन लाखांना घेतली बैलजोडी, सौदा पावती व्हायरल appeared first on पुढारी.

Exit mobile version