Site icon

नाशिक : पद रिक्त होण्यापूर्वीच मनपात अभियंत्याची वर्णी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेमध्ये बांधकाम, नगररचना यासारखे विभाग नेहमीच चर्चेत असतात. आताही बांधकाम विभाग अभियंत्यांच्या नियुक्तीमुळे वादात सापडला असून, याआधी नगररचना विभागात चर्चेत असलेल्या संदेश शिंदे या अभियंत्याला थेट बांधकाम विभागात कार्यकारी अभियंतापदी नियुक्त देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पात्र अभियंत्यांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता राजेंद्र आहेर हे सेवानिवृत्त होण्यापूर्वीच फाइल फिरवून संदेश शिंदे यांची त्या जागेवर वर्णी लावली आहे.

महापालिकेत नगररचना व बांधकाम विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांची कामे होत असतात. यामुळे या कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि ठेकेदार आणि या दोन्हींमध्ये मध्यस्थी करणार्‍यांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते. नगररचना विभागाचा कारभारही यापेक्षा वेगळा नसतो. त्यामुळे मनपात हे दोन्ही विभाग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि त्याठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी प्रत्येक अभियंत्याकडून प्रयत्न आणि वशिला लावला जातो. यामुळे या दोन्ही विभागांकडे अनेकांच्या नजरा लागून असतात. नवीन आयुक्त नियुक्त झाले की, बांधकाम, नगररचना, पाणीपुरवठा, विद्युत विभाग या विभागांमधील अभियंत्यांमध्ये खांदेपालट घडवून आणली जाते. या बदल्यांना कामाच्या सोयीचे नाव जोडले जाते. परंतु, त्यामागील खरे गणित हे आर्थिक उलाढालीचेच असते. गेल्या काही दिवसांपूर्वी मनपात कार्यकारी अभियंता पदावर शिंदे यांची झालेली नियुक्तीही चर्चेत सापडली असून, नगररचना विभागातून बांधकाम विभागामध्ये नियुक्ती झाली आहे. यामुळे पात्र अधिकारी व कर्मचार्‍यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
शिंदे यांना कार्यकारी अभियंतापदी आधीच पदोन्नती मिळाली होती. परंतु, त्यांना इतर कुठल्याही विभागात नियुक्त करण्यात आले नाही, तर बांधकाम विभागातील राजू आहेर यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणार्‍या जागेचीच त्यांना प्रतीक्षा होती की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता या दर्जाचे पद रिक्त असूनही त्या ठिकाणी मात्र जाण्यास कोणीही इच्छुक नाही. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त या नेमणुकांबाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पद रिक्त होण्यापूर्वीच मनपात अभियंत्याची वर्णी appeared first on पुढारी.

Exit mobile version