Site icon

नाशिक : पुलाअभावी गर्भवतीचा डोलीतून प्रवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरीमध्ये रस्त्याअभावी गर्भवतीला डोलीतून आरोग्य केंद्रात नेल्याची घटना ताजी असताना पेठ तालुक्यातही अशीच घटना समोर आली आहे. तालुक्यातील चोळमुख ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे मुरुंबटी गावामध्ये बुधवारी (दि.२३) पुलाअभावी गर्भवतीला डोली करून नदी पार करत प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले गेले. या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला असून, बाळ सुखरूप आहे.

पाट्याची नदीलगत मुरुंबटी गाव वसले आहे. वर्षानुवर्षांपासून या गावाला जाण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना नदी पार करूनच धोकादायक प्रवास करावा लागतो आहे. गावात एखादा व्यक्ती आजारी पडली तर डोली करून नदी पार करत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये न्यावे लागते. गेल्या बुधवारी मुरुंबटीमधील गर्भवती ज्योती दिलीप फसाळे यांना डोलीतून पाट्याची नदी पार करत वाहनाने पुढे कुळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. गावातील एकनाथ जाधव, सखाराम फसाळे, आशासेविका पुष्पा पेंडार यांनी डोलीसाठी पुढाकार घेत फसाळे यांना वेळेत आरोग्य केंद्रात भरती केले. फसाळे यांनी गोंडस मुलीला जन्म दिला.

पाट्याच्या नदीवर पुलासाठी मुरुबंटी गावकरी वर्षानुवर्षांपासून संघर्ष करत आहेत. ग्रामस्थांनी या बाबत लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदनही दिले. सदरचा पूल झाल्यास ग्रामस्थांची कायमस्वरूपी चिंता मिटणार आहे. त्यामुळे तातडीने हा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी गावचे पोलिसपाटील पांडुरंग माळेकर, सरपंच कुसुम पेंढार, उपसरपंच वैशाली बेंडकोळी, हर्षद फसाळे, विजय माळेकर, सोमनाथ जाधव, तुकाराम महाले, चिंतामण महाले, किसन फसाळे, लहानू डोंगारे, कृष्णा शिंगाडे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत पूल मंजूर करण्यात आला आहे. शासनाकडे इस्टिमेट लवकरच होऊन दिवाळीनंतर काम सुरू होईल, अशी आशा पल्लवित झाली आहे. दोनवडे फाटा ते दोनवड गाव 2.50 कोटी, पाटा ते फणसपाडा धुळघाट 2.50 कोटी, कुळवंडी, घनशेत ते पिंपळवटी 3 कोटी, मुरुंबटी पूल व रस्ता 5 कोटी मंजुरी मिळाली असून, या कामी आमदार सुहास कांदे यांनी सहकार्य केले.

– चिंतामण महाले

हेही वाचा :

The post नाशिक : पुलाअभावी गर्भवतीचा डोलीतून प्रवास appeared first on पुढारी.

Exit mobile version