Site icon

नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पेठरोडचा महापालिका हद्दीतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना वाहन चालवतांना अतिशय कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवार (दि २१) रोजी पेठरोड वासियांनी आक्रोश करत पेठरोडवरील मेघराज बेकरी समोर रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी रास्ता रोको न करण्याचे आवाहन केल्याने पोलीस व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली.

पेठरोडवरील हनुमान चौक राऊ हॉटेल ते महानगर पालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली आहे. जवळपास अडीच ते तीन किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने तसेच इतर वाहनांचा मोठया प्रमाणात वर्दळ असल्याने रस्त्यावरील धुळीने रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

सोमवारी, दि.21 सकाळी दहाच्या सुमारास परिसरातील वैद्यकीय व्यवसायिक तसेच नागरिक व महिला मेघराज बेकरी समोर जमा झाले. तेव्हा त्याठिकाणी पेठरोड वासियांनी नाशिक महानगरपालिकेच्या विरोधात तसेच लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. तसेच जोपर्यंत नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी येत नाही. तोपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल असे सांगितल्यावर पोलिसांनी त्याला विरोध केला . पण नागरिक अगोदरच रस्त्याच्या दुरावस्थेने व धुळीमुळे हैराण झालेले असताना मात्र ते देखील पोलिसांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांनी नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मनपा प्रशासनाची चर्चा घडवून देतो असे सांगितल्यावरही काही राजकीय व्यक्तींनी विरोध केल्यावर त्यांना पोलिसांनी पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. अखेर जर मनपाच्या अधिकाऱ्यांनी जर दोन दिवसात याबाबतीत लक्ष न घातल्यास पुन्हा कोणालाही न सांगता परिसरातील नागरिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील असा इशारा दिला . आंदोलनात प्रभाकर पिंगळे , सोमनाथ पिंगळे, दिलीप पिंगळे, राजेंद्र ठाकरे, महेश शेळके, सुनील निरगुडे, प्रतीक पिंगळे, विजय पिंगळे, योगेश कापसे, पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सचिन देवरे, डॉ सचिन भांबेरे, डॉ हेमंत साबळे, डॉ मनीष देवरे, सचिन पवार, दर्शन बोरसे, विलास आवारे व वेदनगरी, इंद्रप्रस्थनगर आदी भागातील महिला व नागरिक मोठया उपस्थित होते .

केवळ घोषणा, कृती शुन्य…

नागरिकांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त तसेच संबधित प्रशासन व लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदन देवुन, पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून नागरिकांच्या निवेदनाला सातत्याने केराची टोपली दाखविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासन व लोकप्रतिनिधींना स्मार्ट सिटीतून या रस्त्याचे काम होणार असल्याचा केवळ गवगवा केला. मात्र आजतागायत रस्त्यावरील साधे खड्डे सुद्धा बुजवण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा उद्रेक झाला. त्यांना अखेर आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

हेही वाचा:

The post नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको appeared first on पुढारी.

Exit mobile version