Site icon

नाशिक : प्रेयसीसाठी प्रियकर बनला दुचाकी चोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रेयसीसोबत फिरण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी एकाने दुचाकी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात संशयिताच्या अल्पवयीन प्रेयसीनेही साथ दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विराज प्रदीप काळे (रा. उपनगर) असे या संशयिताचे नाव असून, त्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काठे गल्ली परिसरातून जुलै महिन्यात दुचाकी वाहनाची चोरी झाली होती. परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केल्यानंतर संशयित चोरटे हेल्मेट परिधान करून आल्याचे समजले. त्यानुसार भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या पथकाने दोन्ही संशयितांची माहिती काढली. हे दोघे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे असून, मौजमजा करण्यासाठी चोरी केल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. जेलरोड परिसरात विराज आणि त्याची मैत्रीण सोबत गप्पा मारत असताना पोलिस कर्मचारी सागर निकुंभ आणि धनंजय हासे यांनी दोघांना ताब्यात घेतले.

त्यावेळी त्यांच्याकडे चोरीचे वाहन मिळून आले. दुचाकी चोरल्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता, घरून पैसे मिळत नसल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने कबूल केले. तर, त्याला साथ देणारी मुलगी अल्पवयीन असल्याने तिची कागदोपत्री नोंद करून समुपदेशनानंतर तिचा ताबा पालकांकडे देण्यात आला. दरम्यान, अधिक तपासात विराजने एक मोबाइलदेखील चोरी केल्याची कबुली दिली.

The post नाशिक : प्रेयसीसाठी प्रियकर बनला दुचाकी चोर appeared first on पुढारी.

Exit mobile version