Site icon

नाशिक : बनावट गुणपत्रकावर मिळवली नोकरी; शिक्षिकेवर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक पात्रता परीक्षेचे बनावट गुणपत्रक देऊन शिक्षक म्हणून नोकरी मिळवल्या प्रकरणी तसेच शासनाची फसवणूक केली म्हणून मालेगावच्या शिक्षिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत फुलारी यांनी सांगितले की, तेजल रवींद्र ठाकरे (२६, रा.मु.पो. वर्हाने पाडा, ता. मालेगाव, नाशिक) या महिलेने शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्याकरिता जि.प. कार्यालयात बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामसुरत कुमार एज्युकेशन ट्रस्ट संचलित मराठी शाळा क्रमांक 2 (ता. मालेगाव जि. नाशिक) येथे दि. १ जून २०१७ रोजी संबंधित महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्यासाठी संबंधित महिला शिक्षिकेने जोडलेली कागदपत्रे पडताळणीसाठी परीक्षा परिषद पुणे यांनी दि. ८ जानेवारी २०२१ रोजी मागविली होती. त्यानंतर त्यांनी दि. २५ जानेवारी २०२१ रोजी संबंधित महिलेने जमा केलेले गुणपत्रक बोगस असल्याचे पत्र शिक्षण उपसंचालक यांना कळविले. लगेचच आठ दिवसांत दि. 3 फेब्रुवारी २०२१ रोजी उपसंचालक यांनी शिक्षणाधिकारी यांना संबंधित महिलेने शासनाची फसवणूक केली आहे. त्याबाबत कारवाई करून अहवाल पाठविण्याचे सूचित केले. तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दि. २५ फेब्रुवारी २०२१ रोजी संबंधित शाळेला पत्र पाठवून कारवाई करण्याची सूचना केली. मात्र, नऊ महिन्यांनंतर नोव्हेंबर महिन्यात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षिकेचा शोध घेतला, तरी ती मिळून आली नाही. त्यामुळे आम्ही त्या शिक्षिकेला कामावरून कमी केल्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी १ फेब्रुवारी २०२२ रोजी उपसंचालकांना अहवाल पाठवला. एक वर्ष उलटून गेल्यानंतर संबंधित शिक्षिकेविरुद्ध कारवाई करण्याबाबत उपसंचालकांनी २४ मार्च २०२३ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना प्राधिकृत केले आणि गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर बुधवारी (दि. २९) पाच दिवसांनी शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जे. के. माळी अधिक तपास करत आहेत.

त्यानंतर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा

रामसुरत कुमार एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त मालेगावचे अद्वय हिरे आहेत. पूर्वाश्रमीचे भाजपचे पदाधिकारी आणि आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच त्यांनी मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा घेतली होती. त्यानंतरच हा गुन्हा दाखल झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात होत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : बनावट गुणपत्रकावर मिळवली नोकरी; शिक्षिकेवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Exit mobile version