Site icon

नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

देश ७७ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करत असताना त्र्यंबक तालुक्यातील ठाणापाडाजवळच्या खैरायपाली ग्रामपंचायत हद्दीतील माचीपाडा या पाड्यावरील महिलेची घरीच प्रसूती झाल्यानंतर तिला बाळासह दवाखान्यात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क झोळीतून न्यावे लागले. माचीपाडाला पक्का रस्ता नसल्याने आजही ग्रामस्थांना तीन किमी अंतरची पायपीट करावी लागते.

माचीपाडातील सरला ज्ञानेश्वर बाह्मणे घरी प्रसूत झाल्या. बाळंतीण व नवजात बाळाला तातडीने दवाखान्यात दाखल करण्याची गरज होती. नजीकच्या ठाणापाडा येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचण्यासाठी माचीपाडापासून पक्का रस्ता नसल्याने साधारणत: दोन ते तीन किमी अंतर पायी प्रवास करावा लागतो. बाळ आणि बाळंतीणला सुखरूप पोहोचवण्यासाठी दीपक टोकरे, स्वप्नील सापटे, राहुल बाह्मणे, ज्ञानेश्वर बाह्मणे यांनी लाकडी बल्लीला शाल बांधून झोळी तयार केली. तुळसा सापटे, आशा कार्यकर्ती मंगल सुबर यांनी सरला आणि बाळाला घेऊन चिखलातील रस्ता तुडवत कसाबसा दवाखाना गाठला. या घटनेने त्र्यंबक तालुक्यातील दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या व्यथा स्वातंत्र्यदिनी पुन्हा उजेडात आल्या आहेत. लोकप्रतिनिधी शहरात रॅली काढत असताना त्यांना आदिवासींच्या हालअपेष्टांचे भानही नाही, हेच या घटनेतून अधोरेखित झाले.

सहा महिन्यांपासून वीज गायब

ठाणापाडाजवळ पुरातन शिवकालीन खैरायकिल्ला आहे. येथे डोंगरउतारावर माचीपाडा वसलेले आहे. साधारणतः २०० लोकसंख्या असलेल्या या पाड्यावर अद्याप मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना माचीपाडात अद्यापही रस्ता, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. गावातील पाचवीपर्यंतच्या शाळेसाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून एक खोली बांधली. एकशिक्षकी शाळेत पहिली ते पाचवी इयत्तेचे मुले-मुली शिक्षण घेतात. पुढील शिक्षणासाठी ठाणापाडा येथे विद्यार्थी दररोज ६ किमीची पायपीट करतात. रस्ता नाही म्हणून एका व्यक्तीला सर्पदंश झाला व उपचाराअभावी तो मृत झाला. वीजपुरवठा करणारे रोहित्र जळाले असून, सहा महिन्यांपासून वीज नाही.

हेही वाचा :

The post नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट appeared first on पुढारी.

Exit mobile version