Site icon

नाशिक : बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूलचालकाने शेकडो जणांना दिले प्रशिक्षण, आरटीओने दिला दणका

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका बेकायदेशीर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकाने प्रादेशिक परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून तब्बल शेकडो नागरिकांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. या ड्रायव्हिंग स्कूलचालकावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहन जप्त करून २५ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

नाशिकरोड येथील जेलरोडवर अशाच एका बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलचालकाची माहिती ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांनी प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांना दिली. त्यानुसार भगत यांच्या आदेशान्वये सहायक मोटर वाहन निरीक्षक मनीषा चौधरी, अब्बास देसाई व नितीन आहेर या अधिकाऱ्यांनी तत्काळ मनोज सीताराम भंडारी (रा. जेलरोड, नाशिकरोड) या बेकायदेशीररीत्या ड्रायव्हिंग स्कूलचालकाचे वाहन (क्र. एम एच ०४ – बीडी ३००२) जप्त करून त्याच्यावर कारवाई करत सुमारे २५ हजार रुपये दंड केला आहे.

‘आरटीओ’च्या डोळ्यात धूळफेक

गेल्या चार ते पाच वर्षांपासून भंडारी हे बेकायदेशीर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देत असल्याचे समोर आले आहे. या काळात त्याने जवळपास ७०० हून अधिक वाहनचालकांना प्रशिक्षण दिल्याचेदेखील समोर आले असून, अधिकृत ड्रायव्हिंग स्कूल नसतानादेखील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन चालवण्याचे परवाने काढून दिले आहेत. या वाहनावर कुठल्याही प्रकारचा अधिकृत ड्रायव्हिंग स्कूलचा फलकदेखील नसून, या वाहनाची कागदपत्रे पूर्ण नाहीत. वाहनदेखील मुदतबाह्य झालेले आहे. मात्र, या वाहनात प्रशिक्षण देण्यासाठी हवा असलेला बदलदेखील करण्यात आलेला आहे. इतके दिवस आरटीओच्या लक्षात कसे आले नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात प्रशिक्षणासाठी अधिकृत ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी दिली आहे. मात्र, शहरात काही बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूल असल्याची माहिती मिळाली असून, तशी तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. तरी वाहनचालकांनी प्रशिक्षण घेताना ड्रायव्हिंग स्कूल व वाहन अधिकृत आहे का, याची तपासणी करून अशाच ठिकाणी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. लवकरच बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूलबाबत तपासणी करून त्यावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

– प्रदीप शिंदे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूलचालकाने शेकडो जणांना दिले प्रशिक्षण, आरटीओने दिला दणका appeared first on पुढारी.

Exit mobile version